राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एक सूचक ट्विट केलं आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात मलिक यांनी हे सूचक ट्विट केलं असावं असं दिसतंय. माझं बोलणं बंद केलं तरी देखील माझ्या ध्येयाला आणि लढ्याला तुम्ही थांबवू शकत नाही, अशा आशयाचं ट्विट मलिक यांनी केलं आहे.

नवाब मलिक यांनी गेल्या महिनाभरापासून पत्रकार परिषद घेत एनसीबीची कारवाई, समीर वानखेडे आणि ड्रग्ज संदर्भातील कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. नवाब मलिक यांनी त्यासोबत रोज नवनवे ट्वीट्स करण्याचा सपाटाही लावला होता. नवाब मलिक यांच्या विरोधात समीर वानखेडे यांच्या वडिलांनी कोर्टात १.२५ कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. नवाब मलिक यांना न्यायालयानं आज त्यांची भूमिका मांडण्यास सांगितलं आहे. नवाब मलिक आज त्या प्रकरणावर नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. मलिक रोज सोशल मीडियावरून टार्गेट करत असल्याचं सांगत त्यांना सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापासून मनाई करण्याचे आदेश देण्याची विनंतीही वानखेडे यांच्या वकिलाने केली आहे. तर वानखेडे यांच्या आरोपावर उद्याच उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने मलिक यांच्या वकिलांना दिले आहेत. नवाब मलिक आज उत्तर दाखल करण्याची शक्यता आहे.