“तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी?”; नोटबंदीच्या निर्णयावरुन नवाब मलिकांचा पंतप्रधान मोदींना सवाल

पाच वर्षे झाली ना काळा पैसा नष्ट झाला ना भ्रष्टाचार, ना दहशतवाद संपला. पण नोटबंदीमुळे बेरोजगारी वाढली, असंही मलिक म्हणाले.

Nawab Malik Narendra Modi

पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मोदी सरकारवर टीका करण्याची संधी विरोधकांनी साधली आहे. जनतेतही याविषयी चर्चा सुरू असून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे.याविषयी आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नोटबंदीच्या निर्णयावर टीका करत असताना ते म्हणाले, नोटबंदीमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. नोट बदलण्यासाठी लोकांना रांगेत उभं राहावं लागलं होतं, अनेकांचा त्यात मृत्यू झाला आणि त्यानंतर मोदीजी म्हणाले होते की, मला तीन महिन्यांचा वेळ द्या. पण पाच वर्षे झाली ना काळा पैसा नष्ट झाला ना भ्रष्टाचार, ना दहशतवाद संपला. पण नोटबंदीमुळे बेरोजगारी वाढली. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था हादरली. आज या निर्णयाला पाच वर्षे झाली. मोदीजी, तुम्ही त्यावेळी म्हणाला होता मला भर चौकात शिक्षा द्या. मोदीजी, आम्ही विचारत आहोत की तो कोणता चौक आहे आणि देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी?

क्रांती रेडकरची बहीण ड्रग्ज व्यवसायात?

गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सतत आरोप करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरवर निशाणा साधला आहे. क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलेली आहे, पुण्यात ड्रग्जचं प्रकरण प्रलंबित असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडेंनी या प्रकरणात उत्तर द्यावं, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nawab malik of demonitisation narendra modi pm vsk

ताज्या बातम्या