उद्या सकाळी १० वाजता फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचा भांडाफोड करणार – नवाब मलिक

तुम्हाला माहिती पुरवणारे कच्चे खेळाडू आहेत, असंही मलिक यावेळी बोलताना म्हणाले.

राज्यात आर्यन खान आणि मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आर्यन खानपासून सुरू झालेलं हे प्रकरण आता थेट भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांवर येऊन ठेपलेलं आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचंही नाव घेतल्याने त्यांनीही आपल्यावरच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वी मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करण्याचं आव्हान दिलेल्या फडणवीसांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्याबद्दलचा खुलासा केला आहे. फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत आता नवाब मलिक पुन्हा एकदा माध्यमांसमोर आले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत. त्यांच्या याच आरोपांना नवाब मलिकांनी आता उत्तर दिलं आहे. याविषयी बोलताना आपण उद्या सकाळी १० वाजता फडणवीसांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड करणार असल्याचं मलिकांनी सांगितलं.

काय आहेत फडणवीसांचे आरोप? येथे वाचा.

याविषयी बोलताना मलिक म्हणाले, आज फडणवीसांनी काही कागदपत्रं लोकांसमोर ठेवली. ज्यात असा उल्लेख आहे की दीड लाख फूट जमीन आम्ही कवडीमोल दराने माफियांच्या मदतीने खरेदी केली. आम्हाला वाटतं की तुम्हाला माहिती पुरवणारे कच्चे खेळाडू आहेत. तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला कागदपत्रं उपलब्ध करुन दिली असती. पण तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरू केलाय. आज तर त्याविषयीच्या सगळ्या गोष्टींबद्दल मी बोलणार नाही. पण उद्या सकाळी १० वाजता देवेंद्रजींचा महाराष्ट्रात अंडरवर्ल्डसोबत काय खेळ सुरू आहे आणि देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे पूर्ण शहराला हॉस्टेज बनवलं होतं, त्याविषयी मी माहिती देईन.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nawab malik on allegations of underworld contact devendra fadnavis vsk

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या