शरद पवारांवर बोलणार्‍या फडणवीसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर शरद पवार काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल आणि त्यांच्या पक्षाबद्दल केलेल्या टिप्पणीवर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार हे मुख्यमंत्री असताना फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आले नाहीत. कालपर्यंत राज्यात २५-३० जागा निवडून येत होत्या ते शरद पवारांवर भाष्य करत आहेत. याअगोदरही शरद पवारांवर देवेंद्र फडणवीस भाष्य करत होते. त्यावेळी काय झाले याची आठवणही नवाब मलिक यांनी फडणवीस यांना करुन दिली आहे.

“ज्या पद्धतीने माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत आणि शरद पवारांच्या बाबतीत भाष्य करत आहेत. कालपर्यंत त्यांच्या पक्षाच्या २५ ते ३० जागा निवडणून येत होत्या. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस कधी विधानसभेमध्ये निवडणून आले नाहीत. ते आम्हाला साडेतीन जिल्हाच्या पक्ष म्हणत आहेत तर इतर जिल्ह्यात आमचे जे आमदार आहेत ते कुठल्या जिल्ह्यातील आहेत याची माहिती त्यांनी घ्यावी. भाजपाला शरद पवारांनी कात्रजचा घाट दाखवला आहे. आता असेच ते भाष्य करत राहिले तर काशीचा घाट दाखवण्याचे कामही शरद पवार करतील,” अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.

गोव्यात शरद पवार भाजपाला आव्हान देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस यांनी टीका केली होती. “हे पाहा विरोधकांचं म्हटलं तर शरद पवारांचा पक्ष असा आहे की, ‘पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया उसके जैसा… ’, मग ते कधी समाजवादी पार्टीशी चर्चा करतात, कधी काँग्रेसशी तर कधी टीएमसीशी बोलतात. कारण ती काही राष्ट्रीय पार्टी नाही. त्यांचं काही राष्ट्रीय अस्तित्वही नाही, त्यांचे काही राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी नक्कीच असेल परंतु ती पश्चिम महाराष्ट्राची पार्टी आहे, थोडी महाराष्ट्राची पार्टी आहे. या पेक्षा ती मोठी पार्टी नाही,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawab malik responds to devendra fadnavis remarks about ncp president sharad pawar abn
First published on: 17-01-2022 at 17:39 IST