scorecardresearch

वाढत्या इंधन दरावरून नवाब मलिकांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाले, “तुमच्या नशीबाने पेट्रोल…”

आजच्या दिवशी पेट्रोल व डिझेल आणि सीएनजी, एलपीजी यांचे भाव गगनाला भिडले आहेत त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

वाढत्या इंधन दरावरून नवाब मलिकांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाले, “तुमच्या नशीबाने पेट्रोल…”

वाढत्या इंधन दरावरून मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “मेरे नसीबसे दाम कम हो रहे है” असं बोलणारे मोदीजी आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत. तुमच्या नशीबाने की जनतेच्या नशीबाने..कोण बदनसीब आहे. देशातील जनता की तुम्ही, याचं उत्तर मोदींनी द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. आजच्या दिवशी पेट्रोल व डिझेल आणि सीएनजी, एलपीजी यांचे भाव गगनाला भिडले आहेत त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदीसरकारवर हल्लाबोल केला आहे.

देशात पेट्रोल-डिझेलच्या मुद्दयावर भाजपाने निवडणूक लढवली. २०१४ मध्ये मोदी देशात सत्तेवर आल्यानंतर काही काळात इंधनाचे भाव कमी केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदींनी माझ्या नशीबानं दर कमी होत आहेत, तर विरोधी पक्षांना का वाईट वाटतंय, तुम्हाला चांगला नशीबवाला हवाय की नाही, असे म्हणत मोदींनी विरोधकांना डिवचले होते. दरम्यान हाच मुद्दा पकडून नवाब मलिक यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. तुमच्या नशीबाने पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेत की जनतेच्या नशीबाने वाढले, याचं उत्तर मोदींनी द्यावं, असं मलिक म्हणाले.

दरम्यान, इंधन दरवाढीने शनिवारी सलग तिसऱ्यांदा उच्चांक गाठला आणि नवी विक्रमी वाढ नोंदवली. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे प्रतिलिटर दर ३५ पैशांनी वाढवण्यात आल्याचे जाहीर केले. नव्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा प्रतिलिटर दर १११ रुपये ४३ पैसे झाला, तर दिल्लीत त्याने १०५ रुपये ४९ पैसे असा नवा उच्चांक नोंदवला. मुंबईत डिझेलचे दर १०२ रुपये १५ पैसे, तर दिल्लीत ते ९४ रुपये २२ पैशांवर गेले आहेत. इंधनातील ही सलग तिसरी दरवाढ आहे. गेल्या तीन आठवडय़ांतील पेट्रोलमधील ही १५ वी, तर डिझेलमधील १८वी दरवाढ आहे. या दरवाढीमुळे, सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-10-2021 at 12:05 IST

संबंधित बातम्या