विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेलापूरमध्ये महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस मला आजही मुख्यमंत्री असल्याचे वाटत असल्याचे म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरुन आता नवाब मलिकांनी फडणवीसांना चांगलाच टोला लगावला आहे मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांच्या या विधानाची राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खिल्ली उडवली आहे. तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका. विरोधी पक्षनेतेपदही तितकंच मोठं आहे, असा चिमटा नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी बोलताना काढला आहे. हेही वाचा - मला आजही वाटते मी मुख्यमंत्री आहे – देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना नवाब मलिक म्हणाले, "दोन वर्ष फिरत असताना मला असं वाटत नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी मुख्यमंत्रीच आहे असं मला वाटतं असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मला वाटतं दोन वर्ष होऊन गेली आहेत. पण ते मुख्यमंत्रिपदाच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाहीत. विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत त्यांनी काम केलं पाहिजे. ते मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी मनातून काढलं पाहिजे. विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मोठं आहे. ते पद मुख्यमंत्रिपदापेक्षा कमी नाही हे त्यांना कळलं पाहिजे". फडणवीस काय म्हणाले होते? दरम्यान, नवी मुंबईतील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं होतं. मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे. मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं, असं फडणवीस म्हणाले होते.