चळवळीत सुरू झालेला शरणागतीचा ओघ थांबवण्यासाठी आता नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने कंबर कसली असून, दुर्गम भागात सक्रिय असणाऱ्या सदस्यांच्या समस्या ऐकून घेण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. या समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश समितीने देशभरातील पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
नक्षलवादी चळवळीचा प्रभाव असलेल्या भागात सुरक्षा दलांच्या मदतीने ‘ग्रीन हंट’ मोहीम सुरू झाली. यामुळे नक्षलवाद्यांची पीछेहाट झाली असून, हिंसक कारवायांमध्ये घट झाली आहे. सदस्यांचे मनोधर्य खचत चालले असून, अनेक सदस्य सध्या विविध राज्यात पोलिसांसमोर शरणागती पत्करत आहेत.
गेल्या दोन महिन्यांत छत्तीसगड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व ओरिसा या चार राज्यात शंभरपेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, असा सुरक्षा दलांचा दावा आहे. काही दिवसापूर्वी छत्तीसगडमध्ये सक्रिय असलेल्या गुडसा उसेंडी या जहाल नक्षलवाद्याने आंध्र प्रदेशात शरणागती पत्करली. शेजारच्या गडचिरोली जिल्ह्य़ात गेल्या ३० दिवसांत चार नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले.
शरणागतीचा हा ओघ थांबवण्यासाठी आता या चळवळीची सूत्रे सांभाळणारी केंद्रीय समिती सक्रिय झाली आहे.
प्रत्येक राज्यात सक्रीय असलेल्या पदाधिकाऱ्यांनी या सदस्यांना नेमके कोणते प्रश्न भेडसावत आहेत, त्यांची मनस्थिती नेमकी कशी आहे, त्यांना काही कौटुंबिक समस्या आहेत का, यासारख्या प्रश्नांचा शोध घेण्याचे निर्देश केंद्रीय समितीने दिले आहेत. या सदस्यांनी शरणागती पत्करावी म्हणून पोलीस व सुरक्षा दलांकडून नेमकी कोणती आमिषे देण्यात येत आहेत व त्या आमिषाला सदस्य का बळी पडत आहेत, याचीही सविस्तर माहिती पदाधिकाऱ्यांनी गोळा करावी, तसेच चळवळीपासून दूर जाण्याच्या मनस्थितीत असलेल्या या सदस्यांची समजूत काढण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काही काळ त्यांच्यासोबत दुर्गम भागात व्यतीत करावा, असेही निर्देश समितीने दिले आहेत.