गडचिरोली जिल्हा पोलिस दलासमोर नक्षलवाद्यांच्या चातगाव दलम कमांडर विजय उर्फ धनिराम केशरी दुग्गा व राधा उर्फ वसंती मनीराम कोवा (२३) या जहाल नक्षलवादी दाम्पत्याने आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला जबर धक्का बसला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात उत्तर व दक्षिण गडचिरोलीत सक्रीय काही दलमचे दलम कमांडर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती आहे.
राज्य शासनाने नव्याने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोली जिल्ह्य़ातील नक्षलवादी मोठय़ा संख्येने आत्मसमर्पण करत आहेत. गेल्या काही महिन्यापूर्वी पोलिस दलासमोर ३ के दलम कमांडर गोपी याने आत्मसमर्पण केले. यामुळे दक्षिण व उत्तर गडचिरोलीतील दलम कमांडरमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला आहे. याचीच परिणिती म्हणून १५ जूनला एकूण सहा गुन्हय़ात सहभागी असलेला चातगाव दलम कमांडर विजय उर्फ धनिराम केशरी दुग्गा (२६,रा.रोपीनगट्टा, ता. धानोरा) याने आत्मसमर्पण केले. विजय दुग्गा हा २००९ मध्ये पेंढरी एलओसी सदस्य म्हणून भरती झाला होता. त्याच बरोबर त्याची पत्नी चातगांव दलम सदस्य राधा उर्फ वसंती मनीराम कोवा (२३,रा.मुंगनेर) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. राधा कोवा ही २००९ मध्ये चातगांव दलम सदस्य म्हणून भरती झाली होती. या दोन नक्षलवादी दाम्पत्याने आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली जिल्ह्य़ातील नक्षलवादी चळवळीला जबर धक्का बसला आहे.
पोलिसांनी आतापर्यंत केलेली कामगिरी व जनतेचा संपादन केलेला विश्वास यामुळे नक्षलवादी मोठय़ा प्रमाणात आत्मसमर्पण करत आहेत. दलम कमांडर विजय दुग्गा हा मरकेगाव, चिमरीकल, मंडोली रिठ, जाराबंडी या चार चकमकीत सहभागी होता, तसेच कुकूम-तोडे मार्गावर ट्रॅक्टर जाळपोळ, देवराव हिचामी मारहाण प्रकरण यात सहभागी होता, तर राधा कोवा ही जाराबंडी व मंडोली चकमकीत सहभागी होती. गडचिरोली जिल्हा पोलिस दल नक्षलविरोधी अभियानासह अथक परिश्रम करून आत्मसमर्पण योजना प्रभावीपणे राबवून अधिकाधिक नलवाद्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. तसेच येत्या काही दिवसात उत्तर व दक्षिण गडचिरोलीतील काही दलमचे दलम कमांडर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करतील, अशी गोपनीय माहिती आहे. दरम्यान, या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला जबर धक्का बसला आहे. अशातच आणखी काही दलम कमांडर आत्मसमर्पणाच्या तयारीत असल्याचे समोर आले असल्याने नक्षली नेते चांगलेच संतापले आहेत. नक्षली नेत्यांचा हा संताप आता दलममध्ये उघडपणे दिसून येत असून एकमेकांवरील अविश्वास हेच त्याचे प्रमुख कारण आहे.