पावसाळय़ात पोलीस तसेच सुरक्षा दलांचा वावर दुर्गम भागात कमी असतो हे गृहीत धरून दलम सदस्यांची अदलाबदल करणे, नातेवाईकांच्या भेटी घडवून आणणे, साहित्य व इतर वस्तूंचा पुरवठा करणे अशा कामांची जबाबदारी पार पाडणाऱ्या महिला सदस्यांच्या एका गटालाच या वेळी पोलिसांनी टिपल्याने नक्षलवाद्यांच्या वर्तुळात बरीच अस्वस्थता आहे.
गेल्या रविवारी गडचिरोली जिल्हय़ातील एटापल्ली तालुक्यातील सेवारीच्या जंगलात झालेल्या चकमकीत सी-६०च्या जवानांनी सहा महिला नक्षलवाद्यांना ठार केले होते. चकमकीच्या २४ तासांनंतर गडचिरोली पोलीस यापैकी तिघींचीच ओळख पटवू शकले. उर्वरित तिघी कोण यावर विचार सुरू असतानाच नक्षलवाद्यांनी या चकमकीचा निषेध करण्यासाठी काढलेले पत्रक पोलिसांच्या मदतीला आले. नक्षलवाद्यांनी या सहाही महिलांची ओळख जाहीर करत या हत्येचा बदला घेतला जाईल, अशी धमकी दिली असली तरी या चकमकीच्या निमित्ताने आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या चळवळीच्या एका कार्यशैलीवर प्रकाश पडला आहे.
पावसाळा सुरू झाला की या चळवळीच्या प्रभाव क्षेत्रातील अनेक रस्ते बंद होतात. या काळात जंगलात शोध मोहिमा राबवणे अतिशय कठीण असते. त्यामुळे पावसाच्या काळात पोलीस व सुरक्षा दले कमी मोहिमा आखतात. ही बाब गृहीत धरून नक्षलवादी याच काळात तुंबलेली अनेक कामे मार्गी लावत असतात.
या चकमकीत ठार झालेले महिलांचे पथक नेमके हेच काम करीत होते. दलममधील सदस्यांची अदलाबदल करणे, ज्या सदस्यांना कुटुंबाशी काम आहे त्यांच्या भेटी नातेवाईकांशी घडवून आणणे तसेच प्रत्येक दलमला लागणाऱ्या वस्तू व साहित्यांचा पुरवठा करणे अशी कामे पावसाळय़ात केली जातात. या कामाची जबाबदारी पार पाडण्यासाठी नक्षलवाद्यांनी प्रत्येक विभागात स्टाफ कमांडर हे पद निर्माण केले आहे. उत्तर गडचिरोली विभागात या पदावर असलेल्या स्वरूपा धुर्वा या महिला कमांडरने गेल्या महिनाभरापासून हे काम हाती घेतले होते.
गडचिरोली जिल्हय़ातील कोसमीची राहणारी स्वरूपा गोंदिया व कोरची दलममध्ये काम करणाऱ्या संतीला मडावी, गीता कोवासी, सीमा, प्रमीला व रेश्मा गावडे या पाच सहकाऱ्यांना सोबत घेऊन या भागात फिरत होती. याच काळात तिने शेजारच्या छत्तीसगडमधील राजनांदगावजिल्हय़ात मूळ गाव असलेल्या संतीला मडावी, गीता कोवासी व सीमा यांना त्या भागात नेऊन मानपूर परिसरातील त्यांच्या नातेवाईकांनासुद्धा भेटवून आणले.
मानपूरहून उत्तर गडचिरोलीत प्रवेश करण्यासाठी ग्यारापत्ती व कोटगूल भागातून अनेक रस्ते उपलब्ध आहेत. स्वरूपाने या रस्त्यांचा वापर न करता मानपूरहून थेट दक्षिण गडचिरोलीत प्रवेश केला. उत्तर गडचिरोली विभागाची हद्द कसनसूर परिसरातील सेवारी, मेंढेर व बांदे नदी ओलांडल्यावर मंगेवाडापर्यंत आहे. महिलांचा हा गट थेट या भागात आला. स्वरूपासोबत असलेल्या सदस्यांना या भागात ठेवण्याचा उद्देश यामागे होता. मंगेवाडाचा परिसर नक्षलवाद्यांचे नंदनवन म्हणून ओळखला जातो. त्यामुळे निर्धास्त असलेल्या या महिला सदस्यांना सी-६०च्या जवानांनी केव्हा घेरले हे समजलेच नाही. आता या सहा महिला सदस्यांच्या मृत्यूचे वास्तव स्वीकारणाऱ्या नक्षलवाद्यांनी या निमित्ताने जारी केलेल्या पत्रकात हे पथक या भागात काही कामानिमित्त आले होते, अशी मोघम कबुली दिली आहे. पोलीस दलातील सूत्रानुसार अदलाबदली व समन्वयाच्या कामाची जबाबदारी असलेल्या स्वरूपासोबत या कामामुळेच पुरुष सहकारी कमी होते. त्याचा फायदा पोलिसांना मिळाला. या महिलांसोबत कंपनीचे सदस्य असते तर एवढी जीवितहानी झाली नसती याची जाणीव झाल्याने आता नक्षलवाद्यांच्या वर्तुळात अस्वस्थता आहे.