|| रवींद्र जुनारकर

तीन महिन्यांत २० ठार; गडचिरोली पोलिसांची कामगिरी

गडचिरोली : दुर्गम व अतिदुर्गम गावात गडचिरोली पोलीस दलाने विणलेले खबऱ्यांचे घट्ट जाळे, त्यांच्याकडून नक्षल दलमची जंगलातील हालचालींची वेळोवेळी मिळत गेलेली विश्वसनीय माहिती, त्या आधारावर सी-६० पथकाचे नक्षलवाद्यांना जंगलात चारही बाजूने घेरण्याचे यशस्वी तंत्र यामुळेच यशस्वी ठरले. मागील काही वर्षात छत्तीसगडच्या तुलनेत गडचिरोली पोलिसांना मोहिमा यशस्वी करण्यात तसेच तीन महिन्यात २० जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे.

संपूर्ण दंडकारण्यात शेकडो नक्षलवाद्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यात अनेक नक्षलवादी करोनामुळे मृत पावले आहेत. अशाही स्थितीत लगतच्या छत्तीसगड  राज्यात नक्षलवादी कारवाया तीव्र आहेत. मागील महिन्यातच नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये पोलिसांना लक्ष्य केले होते. त्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात १ मे २०१९ चे महाराष्ट्रदिनी नक्षलवाद्यांनी जांभुळखेडा येथे घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस शहीद झाल्याच्या घटनेनंतर नक्षलवाद्यांना गडचिरोलीत सर्वच पातळ्यांवर अपयश आले आहे. आज गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर उत्तर व दक्षिण गडचिरोली अशा दोन विभागात हा जिल्हा विभागला गेला आहे. या दोन्ही विभागात नक्षलवादी सक्रिय असले तरी आता या चळवळीचे कंबरडे पूर्णत: मोडण्यात पोलीस दलाला यश आले आहे. आता गडचिरोलीत एकही जुना वरिष्ठ नक्षलवादी शिल्लक राहिलेला नाही. जे काही नक्षली सक्रिय आहेत, ते सर्व खंडणीखोर आहेत. चळवळीत सक्रिय असलेल्या अनेक वरिष्ठ नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवत आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला आहे. नक्षलवाद्यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडण्यास आज येथील शिक्षित-अशिक्षित तरुण तयार नाहीत. त्याच्या परिणामी चळवळ टिकून राहावी यासाठी लगतच्या छत्तीसगड येथून युवकांना येथे आणावे लागत आहे. छत्तीसगडमधून आलेल्या युवकांना या भागाची माहिती नाही. त्यामुळेच त्यांना या भागात चळवळ अतिदुर्गम भागात अधिक घट्ट रोवण्यात अपयश आले आहे.

जनजागृती अभियान

याउलट गडचिरोली पोलीस दलाने कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान अधिक आक्रमकपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. गडचिरोली पोलिसांनी सातत्याने मोहिमा राबवून तथा नक्षली स्थळांना लक्ष्य करून यश मिळवले आहे. गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या नेतृत्वात अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सी-६० पथकाच्या  जवानांनी गनिमीकाव्याने नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीम आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच परिणाम मार्च, एप्रिल व मे या अवघ्या तीन महिन्यात वीस नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे.

चळवळीला सुरुंग

’ जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटात सहभागी सर्व नक्षलवादी एकेक करून अटक झाले किंवा चकमकीत ठार झाले आहेत. जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटाची मुख्य सूत्रधार नक्षलवादी नेता नर्मदाक्का ही अटकेत आहे. जहाल नक्षलवादी विलास कोला याने आत्मसमर्पण केले आहे. नक्षल कमांडर भास्कर, किशोर कवडू,  सुखलाल व पवन हा जहाल नक्षली चकमकीत मरण पावला आहे. कोटमीच्या जंगलातील चकमकीत कंपनी क्रमांक चारचा विभागीय समिती सदस्य सतीश याला ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तेंदुपत्ता लिलावातून खंडणी

’ नक्षलवाद्यांना गडचिरोली व लगतच्या छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातील तेंदुपत्ता कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी मिळते. ही खंडणी नक्षल चळवळीचे मोठे आर्थिक बळ आहे. दरवर्षी किमान शंभर कोटीची खंडणी तेंदू कंत्राटदारांकडून वसूल केली जाते. ही खंडणीच नक्षलवादी चळवळीचा मोठा आर्थिक स्रोत आहे.

सात वर्षात ८७ नक्षलवादी ठार

मागील सात वर्षात गडचिरोली पोलीस दलाने ८७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात २० नक्षली ठार केले आहेत. यामध्ये २८ मार्च रोजी कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा चकमकीत पाच नक्षलवादी ठार केले. त्यानंतर २८ एप्रिल रोजी एटापली तालुक्यातील गट्टा जांबिया चकमकीत दोन नक्षलवादी व २१ मे रोजी कोटमी पैडी जंगलातील चकमकीत तेरा नक्षलींना ठार करण्यात यश आले. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी पोलीस दलाने बोरियाच्या जंगलात ४० नक्षलवादी एकाच वेळी ठार केले होते. त्या घटनेनंतर गडचिरोली पोलीस नक्षलवाद्यांवर सातत्याने दबाव निर्माण करीत आहेत. कोटमीची चकमक ही गडचिरोली पोलीस दलातील नक्षलीविरुद्धची सर्वोच्च चकमक होती. उत्तर गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या होत्या. मात्र गडचिरोली पोलीस दलाने नक्षली दलमने डोके वर काढण्यापूर्वीच वेळीच उत्तर गडचिरोलीतील सर्व नक्षली दलम संपुष्टात आणले आहेत. सी-६० पथकाचे हे यश आहे. बहुतेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे किंवा चकमकीत ठार झाले आहेत. कसनसूर दलमची २० वर्षे गडचिरोलीत दहशत होती. मात्र कसनसूर दलमच संपुष्टात आणल्याने गडचिरोली पोलिसांचे मोठे यश आहे. अतिदुर्गम भागात पोलीस ठाणी, दर पंधरा किलोमीटर अंतरावर पोस्ट उभारण्यात आले. स्थानिक आदिवासींची पोलीस दलात भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यामुळेच गडचिरोली पोलिसांना सांघिक यश मिळत आहे. निश्चितच सर्व पोलीस अधिकारी व सी-६० पथकाची कामगिरी उत्कृष्ट आहे. लोकांचा विश्वास जिंकल्यामुळे नक्षलवाद्यांची माहिती मिळते व त्यावर मोहिमा आखल्या जात आहेत.  – संदीप पाटील, उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र.

कोटमी पैडी जंगलातील चकमकीत कसनसूर दलम तथा कंपनी क्रमांक चारचे नक्षलवादी ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य सतीश या चकमकीत ठार झाल्यामुळे गडचिरोलीत आता नक्षली चळवळीकडे नेतृत्व शिल्लक राहिलेले नाही. खोब्रामेंढा व आता कसनसूर दलम पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे उत्तर गडचिरोलीत नक्षल चळवळीचे नेतृत्वच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे येत्या काही वर्षात संपूर्ण गडचिरोलीतून नक्षलवादी चळवळ हद्दपार होईल असेच काहीसे चित्र आहे. – अंकित गोयल, पोलीस अधीक्षक गडचिरोली