कोणत्याही गावापासून मतदान केंद्राचे अंतर ३ किलोमीटरपेक्षा जास्त असू नये, असे निवडणूक आयोगाचे निर्देश असले तरी नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे गडचिरोली जिल्हय़ात या निर्देशाचे पालन शक्य नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याने ३३ गावांमधील नागरिकांना मतदानासाठी ५ ते १५ किलोमीटरची पायपीट करावी लागणार आहे.
नक्षलवादी चळवळीच्या प्रभावामुळे तसेच या चळवळीकडून होणाऱ्या हिंसाचारामुळे गडचिरोली जिल्हय़ात निवडणूक प्रक्रिया राबवणे प्रशासनापुढील सर्वात मोठे आव्हान असते. यावेळी सुद्धा प्रशासनाने हे आव्हान पेलण्याची जय्यत तयारी केली असली तरी आयोगाच्या एका निर्देशाचे पालन करणे शक्य नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या काळात नक्षलवादी दुर्गम भागात हिंसाचार घडवून आणतात. त्यामुळे या भागातील काही मतदान केंद्रे दरवेळी हलवली जातात.
यावेळी प्रशासनाने ३३ गावांमधील मतदान केंद्रे सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यात भामरागडमधील ७, धानोरा तालुक्यातील ६, घोट व सिरोंचा तालुक्यातील प्रत्येकी १, कुरखेडा तालुक्यातील ५, एटापल्लीतील ८ व अहेरी तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे. या ३३ गावांमध्ये मतदान केंद्र उभारले तर हिंसाचार होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर केंद्र हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या केंद्रांना आयोगाची मान्यता हवी असल्याने तसा प्रस्ताव आयोगाकडे पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिली.
 केंद्र हलवण्याच्या या निर्णयामुळे आयोगाच्या अंतराच्या संदर्भातील निर्देशाचे पालन होणार नसले तरी त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय प्रशासनाकडे नाही, असे हक यांनी सांगितले. यामुळे यावेळी या ३३ गावातील नागरिकांना मतदानासाठी बरीच पायपीट करावी लागणार आहे. भामरागड तालुक्यातील बिनागुंडा, नेलगोंडा, भटपार या गावांसाठी ढोढराजला मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांना मतदानासाठी किमान १५ ते १८ किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे. एटापल्ली तालुक्यातील मेंढरी, पिपली बुर्गी या गावांना १० किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. आजवरचा अनुभव बघता नागरिक हा प्रवास करून सुद्धा मतदानाला येतात. त्यामुळे प्रशासन या केंद्रावर मतदान होईल यावर आश्वस्त आहे. या ३३ गावांमध्ये मतदान केंद्र उभारणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्वाचा जीव धोक्यात टाकणे ठरले असते. त्यामुळे स्थलांतरण करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता असे प्रशासनाचे म्हणणे आहे.