जहाल नक्षलवादी चळवळीचा वनवास सोडून १४ वर्षांपूर्वी परतलेल्या विठा कारे कुळमेथे ( ४२) याची जिमलगट्टाच्या आठवडी बाजारात नक्षलवाद्यांनी रविवारी गोळ्या घालून हत्या केली .
अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील विठा कुळमेथे हा नक्षलवादी चळवळीत सक्रीय होता. मात्र, नक्षलवाद्यांच्या अत्याचाराला कंटाळून २००० साली त्याने या चळवळीला रामराम ठोकला. त्यानंतर तो आपल्या गावी परत आला. दरम्यानच्या काळात तो अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा पोलिस ठाण्यात राहून पोलिसांची छोटी-मोठी कामे करू लागला. मात्र, नक्षलवाद्यांचा त्याच्यावर राग असल्याने ते त्याच्या मागावर होते. रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास विठा सामान खरेदीसाठी जिमलगट्टाच्या आठवडी बाजारात आलेला होता. त्याच बाजारात नक्षलवादी विठाच्या मागावर होते. विठाला नि:शस्त्र बघून नक्षलवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात विठा जागीच मरण पावला.