अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सारे आयुष्य झोकून देणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्त्येने सारे समाजमन हळहळत असताना माओचे नाव घेत आदिवासींच्या उत्थानाची भाषा करणारे नक्षलवादी मात्र अंधश्रद्धेतून आलेल्या तक्रारीवरून आदिवासींची हत्या करायला सुद्धा मागेपुढे बघत नसल्याचे एका घटनेतून दिसून आले आहे.
नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या दंडकारण्य भागात राहणाऱ्या आदिवासींमध्ये अंधश्रद्धेचे प्रमाण खूप जास्त आहे. अजूनही मोठय़ा संख्येत अशिक्षित असलेल्या आदिवासींवर अंधश्रद्धेला निमंत्रण देणाऱ्या पुजाऱ्यांचा बराच पगडा आहे. या भागातील बऱ्याच गावांमध्ये मंत्रतंत्रासारखे प्रकार उघडपणे चालतात. गेल्या ३० वर्षांपासून या भागात सक्रिय असलेल्या व संपूर्ण आदिवासी समाज चळवळीच्या पाठीशी आहे असा दावा करणाऱ्या नक्षलवाद्यांनी आजवर कधीही या समाजातील ही अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. या मुद्दय़ावर कायम मौन बाळगणाऱ्या नक्षलवाद्यांनी अंधश्रद्धेतून आलेल्या तक्रारीवर मात्र तत्परता दाखवत एका आदिवासीची हत्त्या करण्याचा प्रकार केल्याचे आता निदर्शनास आले आहे.
एटापल्ली तालुक्यातील कसनसूरच्या जवळ असलेल्या कारका या गावात राहणाऱ्या एका आदिवासीचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्याच्या पत्नीने हा मृत्यू नैसर्गिक नसून याच गावातील पितरू हेडो या व्यक्तीने मंत्रतंत्र केल्यामुळे झाला असा आरोप केला. एवढय़ावरच ही महिला थांबली नाही तर तिने या प्रकरणाची तक्रार नक्षलवाद्यांकडे केली. तक्रार मिळताच नक्षलवाद्यांनी गावात येऊन पितरू हेडोची कुऱ्हाडीने गळा कापून हत्त्या केली. प्रारंभी या हत्त्येकडे पोलिसांच्या खबऱ्याची हत्त्या याच दृष्टिकोनातून बघितले गेले. पोलिसांनी त्यांच्याकडील नोंदी तपासल्यानंतर पितरू हेडो हा खबऱ्या नसल्याचे स्पष्ट झाले. तरीही ही हत्या का झाली असावी याचा शोध पोलिसांनी घेतला असता हे खरे कारण समोर आले.
नक्षलवादी केवळ ही हत्या करून थांबले नाहीत तर त्यांनी पितरू हेडोच्या पत्नीला शासनाकडून देण्यात येणारी मदत मिळू नये यावरही लक्ष ठेवले. नक्षलवाद्यांनी एखाद्याची हत्त्या केली तर शासनाकडून ४ लाख रुपये मिळतात. किमान ही रक्कम तरी पितरूच्या बायकोला मिळावी म्हणून याच गावातील तानाजी नरोटे या तरुणाने पोलिसांकडे चकरा मारणे सुरू केले. हा प्रकार लक्षात येताच नक्षलवाद्यांनी तानाजीला सुद्धा ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे गाव सोडावे लागलेला हा तरुण आता शेती व घर सोडून एटापल्लीला स्थलांतरित झाला आहे. या संपूर्ण प्रकरणातील गांभीर्य लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अतिशय गुप्तपणे पितरूच्या बायकोला शासकीय मदत मिळवून दिली. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर झटणाऱ्या पुण्यातील डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्त्येने अजूनही समाजमन अस्वस्थ आहे. या प्रकरणातील आरोपी सापडत नसल्याने विचारवंतांच्या वर्तुळात अस्वस्थता आहे. या पाश्र्वभूमीवर आम्हाला बुद्धिवंतांचा पाठिंबा आहे, असा दावा करणाऱ्या नक्षलवाद्यांनी केलेले हे कृत्य ही चळवळ विचारधारेवर चालणारी नाही हेच दर्शवणारे आहे. ही हत्त्या काही महिन्यांपूर्वीची असली तरी त्यामागील खऱ्या कारणाचा शोध आता लागला, अशी माहिती एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.