गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये मारला गेलेला जहाल नक्षलवादी किशनजीच्या पहिल्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून नक्षलवाद्यांनी त्याच्या जागी नुकतीच कोसाची नियुक्ती केली आहे. या पाश्र्वभूमीवर नक्षलवादी हिंसक कारवाया करण्याची शक्यता असल्याने संपूर्ण दंडकारण्य भागात सुरक्षा दलांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.  
 पश्चिम बंगाल, झारखंड व बिहार या राज्यांमधील चळवळीची सूत्रे सांभाळणारा जहाल नक्षलवादी कोटेश्वरराव उर्फ किशनजी गेल्या वर्षी २४ नोव्हेंबरला केंद्रीय राखीव पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. या चळवळीत पहिल्या पाच क्रमांकांच्या नेत्यांमध्ये किशनजीची गणना होत होती. त्याच्या हत्येमुळे या चळवळीला मोठा हादरा बसला. किशनजीच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी कुणाची नेमणूक करावी, यावरून नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीत बराच खल झाला. अखेर त्याच्या पहिल्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून आता त्याच्या जागी कोसाची नेमणूक करण्यात आली आहे.
मूळचा आंध्रप्रदेशातील पेद्दापल्लीजवळील गोपालरावपल्ली गावच्या कोसाचे नाव कादरी सत्यनारायण राव असून तो १९८२ मध्ये या चळवळीत दाखल झाला. प्रारंभी साधू नंतर गोपन्ना या नावाने सक्रीय असलेल्या कोसाने शेजारच्या गडचिरोलीत दोन वष्रे काम केले आहे. सध्या ५२ वर्षांच्या असलेल्या कोसाच्या शिरावर आंध्रप्रदेश सरकारने सात लाखाचे बक्षीस ठेवले आहे. तीन वर्षांंपूर्वी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्य़ातील ताडमेटलाच्या जंगलात नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ७६ जवानांना ठार केले होते. ही संपूर्ण हिंसक कारवाई कोसाच्या नेतृत्वाखाली झाली होती.
आजवर दंडकारण्य स्पेशल झोन कमेटीचे सचिवपद सांभाळणाऱ्या कोसाला जाणीवपूर्वक ही नवी जबाबदारी देण्यात आली आहे. सुरक्षा दलाच्या सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे. गेल्या वर्षी किशनजी ठार झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी संपूर्ण दंडकारण्य भागात ठिकठिकाणी पत्रके टाकून या घटनेचा निषेध नोंदवून अनेक ठिकाणी जाळपोळ व हिंसक घटना घडवून आणल्या. या पाश्र्वभूमीवर आता कोसाची झालेली नेमणूक व किशनजीचा स्मृतीदिन लक्षात घेऊन नक्षलवादी येत्या काही दिवसात आणखी हिंसक कारवाया घडवून आणण्याची शक्यता आहे. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्वत्र सतर्कतेचा इशारा दिला आहे. किशनजीच्या मृत्यूनंतर गेल्या वर्षी नक्षलवाद्यांनी तब्बल आठ दिवस बंद पाळला होता. यावेळी तसे आवाहन करणारी पत्रके मिळाली नसली तरी नक्षलवादी सुरक्षा दलांना गाफील ठेवून अचानक काहीही करू शकतात, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात शोध मोहिमा राबवतांना जवानांनी प्रचंड खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.