विदर्भातील काही स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन गडचिरोली जिल्ह्य़ात आयोजित केलेल्या शोधयात्रेला नक्षलवाद्यांनी एका पत्रकातून विरोध केला आहे. या विरोधाला न जुमानता यात्रा काढण्यावर ठाम असलेल्या आयोजकांनी नक्षलवाद्यांनी विरोधाऐवजी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
गेल्या तीन दशकापासून नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे राज्याच्या टोकावर असलेला गडचिरोली जिल्हा विकासापासून दूर राहिला आहे. पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या लढाईत या जिल्ह्य़ातील आदिवासी भरडला जात आहे. या आदिवासींची अवस्था नेमकी कशी आहे, या भागातील विकास कामांची स्थिती काय आहे आणि आदिवासींच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी प्रा. अरविंद सोहनी यांच्या नेतृत्वाखाली येत्या २ ते ११ जानेवारीपर्यंत ही शोधयात्रा गडचिरोली जिल्ह्य़ाच्या दुर्गम भागात फिरणार आहे. या यात्रेत राज्यातील अनेक तरुण सहभागी होत आहेत. या यात्रेचा तपशील जाहीर होताच नक्षलवाद्यांनी रविवारी एक पत्रक प्रसिद्धीला देऊन यात्रेला विरोध केला आहे.
राज्य समितीचा सचिव सहय़ाद्रीने काढलेल्या या पत्रकात आधी जनदृष्टीचा बोध घ्या, मग शोधयात्रा काढा, असा सल्ला नक्षलवाद्यांनी दिला आहे. देशातील अनेक स्वयंसेवी संस्थांना सध्या दुर्गम भागातील आदिवासींचा पुळका आला आहे. त्यातूनच या यात्रेचा जन्म झाला असावा, अशी टीका नक्षलवाद्यांनी केली आहे. आदिवासींना मदत करण्याची भाषा करणारे यात्रेचे आयोजक गेल्या अनेक वर्षांंपासून पोलिसांनी चालवलेल्या हिंसाचाराविरुद्ध का बोलत नाहीत, असा सवाल नक्षलवाद्यांनी केला आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी अनेक गावांमध्ये आदिवासींना बेदम मारहाण केली. त्याचा निषेधही या संयोजकांनी केल्याचे आठवत नाही. येथील आदिवासी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करत आहेत. या मुद्यावर विदर्भातले हे बुद्धीवादी गप्प का बसतात, असा सवाल नक्षलवाद्यांनी उपस्थित केला आहे. ही यात्रा पोलिसांनी, तसेच गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी प्रायोजित केली असून जेथे पोलिसांचे तळ आहेत तेथेच ही यात्रा जाणार आहे, असा आरोप या पत्रकातून करण्यात आला आहे. दरम्यान, यात्रेच्या आयोजकांनी नक्षलवाद्यांनी घेतलेल्या आक्षेपांचे खंडन केले असून त्यांच्या विरोधाला न जुमानता यात्रा काढण्यावर ठाम असल्याचे मत एका पत्रकातून व्यक्त केले आहे. सामान्य माणसांनी आदिवासींचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यात नक्षलवाद्यांना गैर वाटण्याचे कारण काय, असा सवाल आयोजकांनी उपस्थित केला आहे.
 या भागातील आदिवासींचे प्रश्न समजून घेण्याचा हक्क नक्षलवाद्यांप्रमाणेच इतरांनाही आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांनी या यात्रेला विरोध न करता सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आदिवासींच्या प्रश्नांच्या संदर्भात नक्षलवाद्यांची भूमिका ऐकण्याची तयारीही आयोजकांनी दाखवली आहे. या यात्रेचा पोलिसांशी कोणताही संबंध नाही, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.