अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीचा नक्षलवाद्यांनी कडाडून विरोध केला असून, जिल्हय़ातील कमलापूर गावात ठिकठिकाणी भित्तीपत्रके, फलक लावून व पत्रके वाटून प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे.
नक्षलवाद्यांनी अमेरिकेला जगातील जनतेचा शत्रू ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना निमंत्रण दिले आहे. त्यानुसार ते २६ जानेवारीला दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर येत आहेत. ओबामा यांची भारत भेट दोन्ही देशांसाठी धोरणात्मक असल्याने संपूर्ण जगाचे याकडे लक्ष लागले आहे. मात्र, स्वतंत्र दंडकारण्याचे पुरस्कर्ते असलेल्या नक्षलवाद्यांनी ओबामा यांच्या भारत भेटीला कडाडून विरोध केला आहे. ओबामा हे भांडवलशाही देशांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांना भारतात येण्यापासून मनाई करा, असे जाहीर आवाहन करणारी भित्तीपत्रके व फलक नक्षलवाद्यांनी कमलापूर या गावात ठिकठिकाणी लावली आहेत.
अहेरी तालुक्यांतर्गत येणारे कमलापूर हे गाव नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. कमलापूर तसेच जिमलगट्टा व आजूबाजूच्या गावात नक्षलवाद्यांचे वास्तव्य आहे.
या गावातील चौकाचौकात ओबामांच्या भारत भेटीच्या विरोधातील भित्तीपत्रके लागली आहेत. तसेच अतिदुर्गम भागात पत्रके व फलक लावण्यात आलेले आहेत.
अमेरिका हा जगातील सर्व जनतेचा क्रमांक एकचा शत्रू आहे. साम्राज्यवादी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी भारत बंदचे आवाहन भाकपा माओवादी या नक्षलवाद्यांच्या संघटनेने केले आहे.
गडचिरोली जिल्हय़ातील अतिदुर्गम भागातील गावात ओबामांच्या भारत भेटीच्या निषेधाचे फलक ठिकठिकाणी दिसत आहेत. साम्राज्यवादी अमेरिकेपासून भारताला सुरक्षित ठेवायचे असेल तर ओबामांना भारतात येऊ देऊ नका, असे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे. गडचिरोलीसोबतच झारखंड व छत्तीसगड राज्यातील बस्तर विभागांत ओबामांच्या भारत भेटीच्या निषेधाची भित्तीपत्रके व फलक लागलेली आहेत.