scorecardresearch

सहकारी मोठय़ा प्रमाणात मारले गेल्याची नक्षलवाद्यांची कबुली

* पोलिसांच्या निषेधार्थ आज ‘दंडकारण्य बंद’चे आवाहन * नागरिकांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती अलीकडे झालेल्या तीन मोठय़ा चकमकींत अनेक सहकारी मारले गेल्याने चळवळीची हानी झाली, अशी कबुली देतानाच नक्षलवाद्यांनी या चकमकीत ठार झालेल्या सामान्य नागरिकांच्या मृत्यूची सत्यशोधन समितीकडून चौकशी करण्याची घोषणा केली आहे.

*  पोलिसांच्या निषेधार्थ आज ‘दंडकारण्य बंद’चे आवाहन
*  नागरिकांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती
अलीकडे झालेल्या तीन मोठय़ा चकमकींत अनेक सहकारी मारले गेल्याने चळवळीची हानी झाली, अशी कबुली देतानाच नक्षलवाद्यांनी या चकमकीत ठार झालेल्या सामान्य नागरिकांच्या मृत्यूची सत्यशोधन समितीकडून चौकशी करण्याची घोषणा केली आहे. पोलिसांच्या या कारवाईला तेवढेच प्रखरतेने उत्तर दिले जाईल, असा इशारा देणाऱ्या नक्षलवाद्यांनी उद्या शनिवारी ‘दंडकारण्य बंद’चे आवाहन केले आहे.
 शेजारच्या गडचिरोली जिल्हय़ात गेल्या जानेवारीपासून झालेल्या तीन मोठय़ा चकमकींत १५ नक्षलवादी ठार झाले. यामुळे संतप्त झालेल्या नक्षलवाद्यांनी आज जारी केलेल्या एका पत्रकातून पोलिसांवर कठोर टीका करतानाच अधिक आक्रमक होण्याचा इशारा दिला आहे. दक्षिण गडचिरोलीत सक्रिय असलेल्या पश्चिम विभाग समितीचा प्रवक्ता श्रीनिवासने जारी केलेल्या या पत्रकात नेहमीप्रमाणे पोलिसांवर खोटय़ा चकमकी घडवून आणल्याचा आरोप केला आहे. गेल्या ४ एप्रिलला भामरागड तालुक्यात भटपर येथे झालेल्या चकमकीत अडीचशे नक्षलवादी नव्हतेच, तरीही पोलिसांनी शेखी मिरवण्यासाठी नक्षलवाद्यांचा आकडा फुगवला. या चकमकीच्या वेळी या भागात सक्रिय असलेल्या दलमचे केवळ तीन सदस्य आणि भटपरचे चार गावकरी हजर होते. या सर्वाना घेराव घालून ठार करण्यात आले. या चकमकीत भटपरच्या दोन तरुणीसुद्धा ठार झाल्या. या घटनेत केवळ लक्ष्मण व अम्मी हे आमचे दोनच सहकारी ठार झाले, असा दावा नक्षलवाद्यांनी या पत्रकातून केला आहे.
धानोरा तालुक्यात झालेल्या सिंदेसूरच्या चकमकीत ठार झालेल्या चार नक्षलवाद्यांपैकी दोन महिला सहकाऱ्यांना सी-६० च्या जवानांनी जिवंत पकडले. नंतर या दोघींवर जवानांनी अत्याचार केले व शेवटी ठार मारले, असा आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे. या चकमकीतसुद्धा गावातील दोन तरुण ठार झाले. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक सध्या नवजीवन योजनेचा गाजावाजा करीत असले तरी सामान्य व निरपराध नागरिकांना ठार करणे व नंतर त्यांना नक्षलवादी म्हणून जाहीर करणे हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे काय, असा सवाल नक्षलवाद्यांनी या पत्रकातून उपस्थित केला आहे. सध्या संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचार व बलात्काराच्या प्रकरणांची चर्चा सुरू असताना गडचिरोली पोलीस तोच प्रकार या जिल्हय़ाच्या दुर्गम भागात राबवीत आहेत, असा आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे.
या चकमकींमध्ये १५ पेक्षा जास्त सहकारी ठार झाले असे नमूद करणाऱ्या नक्षलवाद्यांनी यामुळे चळवळीची हानी झाली अशी कबुली प्रथमच या पत्रकातून दिली आहे. शेजारच्या छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्हय़ात चळवळीतील ९ सहकारी पोलिसांच्या कारवाईत ठार झाले. या चकमकीतसुद्धा अनेक आदिवासी जखमी झाल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे.
भांडवलशाही व्यवस्थेचे प्रतीक असलेल्या गडचिरोली पोलीस दलातील सुवेझ हक व त्यांच्या सहकाऱ्यांना सामान्य लोकांना ठार करून या जिल्हय़ातील खनिज संपत्ती लॉयड मेटल, गोपानी आयर्न व इस्पातसारख्या कंपन्यांच्या हाती सोपवायची आहे, असा आरोप या पत्रकातून करण्यात आला आहे. पोलिसांच्या कारवाईत ठार झालेल्या सामान्य नागरिकांच्या मृत्यूची सत्यशोधन समितीकडून चौकशी करण्याचा इरादा नक्षलवाद्यांनी या पत्रकातून जाहीर केला आहे. पोलिसांच्या कारवाईला भविष्यात प्रखरतेने उत्तर दिले जाईल, असा इशारा देणाऱ्या नक्षलवाद्यांनी उद्या बंदचे आवाहन केले आहे.
नक्षलवाद्यांच्या बंदच्या पाश्र्वभूमीवर आज छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे तीन राज्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेशचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला हजर होते. या बैठकीत आंतरराज्य संबंधांना आणखी बळकटी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-04-2013 at 04:09 IST

संबंधित बातम्या