कृतीतून विकासात्मक राजकारणाचा आदर्श ; नक्षलवादी ते सभापती : गिरिजा भलावीची थरारकथा

गडचिरोलीच्या टोकावर वसलेल्या आरेवाडा या छोटय़ाशा गावातील कुडीयानी परिवारात गिरिजा यांचा जन्म झाला.

गडचिरोली : दहा वर्षे घनदाट जंगलात खडतर नक्षलवादी आयुष्य जगल्यानंतर नक्षल चळवळीला रामराम ठोकून थेट पंचायत समिती सभापतीचे पद गाठल्याची थरारक कहाणी आहे गडचिरोलीतील गिरिजा भलावी या महिलेची. गिरिजा भलावीने खडतर व संघर्षपूर्ण आयुष्यातून बाहेर पडून कल्याणकारी व आदर्श जीवन जगता येते हे आपल्या जगण्यातूनच दाखवून दिले आहे.

गडचिरोलीच्या टोकावर वसलेल्या आरेवाडा या छोटय़ाशा गावातील कुडीयानी परिवारात गिरिजा यांचा जन्म झाला. नक्षलवादी चळवळ काय असते ते माहीत नसण्याच्या वयात अर्थात १९९२ साली त्या नक्षलवाद्यांसोबत गेल्या आणि नक्षलवादी बनल्या. नंतर नक्षल दलममधील पवनकुमार भलावी यांच्यासोबत त्यांचे लग्नही झाले. त्यानंतर १० वर्षे त्या नक्षली म्हणून खडतर आयुष्य जगत होत्या. दरम्यान, २००१ मध्ये त्यांचे पती पवनकुमार भलावी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करणे आवश्यक झाले होते. दोघेही गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात आले. पवनकुमार यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. गिरिजा त्यांची सेवा करीत होत्या. दरम्यान, नक्षलवादी गिरिजा आणि पवनकुमार रुग्णालयात उपचार घेत असल्याचा सुगावा पोलिसांना लागताच त्यांनी दोघांनाही अटक केली. अटक झाल्यानंतरही गिरिजा भलावी डगमगल्या नाहीत. कारागृहात राहून खंबीरपणे त्यांनी अ‍ॅड्. सुरेंद्र गडलिंग यांच्या मदतीने कायदेशीर लढाई लढली. अखेर न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

त्यानंतर नक्षलवाद सोडून हे दाम्पत्य नागरी जीवनात आले. मात्र, जनसेवेची  कळकळ त्यांना शांत बसू देत नव्हती. २००५ साली त्या भामरागड ग्रामपंचायतची निवडणूक लढवून त्या सदस्य झाल्या. एवढय़ावरच न थांबता २००७ मध्ये भामरागड पंचायत समितीच्या सभापतिपदाची निवडणूक लढवून त्या सभापतीही झाल्या.

आदिवासीपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी शासनाशी झगडून अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. २०१२ च्या निवडणुकीत गिरिजा या अवघ्या एका मताने पराभूत झाल्या. त्यांच्या पराभूत होण्यालासुद्धा मोठे कारण आहे.

नक्षली जीवन सोडून समाजसेवा करीत असल्यामुळे नक्षलवाद्यांनी निवडणूकीपूर्वी आरेवाडा येथे त्यांच्या शेताजवळच त्यांच्या पतीची हत्या केली. तरीही त्या डगमगल्या नाहीत. लोकसेवेचा एकाकी संघर्ष त्यांनी सुरू ठेवला. विशेष म्हणजे, राजकारण हे वैयक्तिक स्वार्थाचे नाही तर विकासाचे साधन म्हणून त्याकडे त्या बघतात. स्वत:चे पोट भरण्यासाठी त्या शेतात राबतात. मत्स्यपालन, कुक्कुटपालन यासह प्रगतिशील शेती करतात. राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा करण्याची त्यांची इच्छा आजही आहे. पण निवडणुकीच्या राजकारणात सुरू झालेल्या बजबजपुरीत त्यांना संधी नाही. मात्र, त्यांनी स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Naxalites to speakers thrilling story of girija bhalavi zws

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या