जंगलात नक्षलवाद्यांचा माग काढताना ठरवून दिलेल्या मानक कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाने पुन्हा एकदा नव्याने दिले आहेत. दरम्यान, गडचिरोलीत गेल्या आठवडय़ात झालेल्या स्फोटाचा कट जहाल नक्षलवादी दिनकर व रावजी तुलावीने रचला होता, अशी माहिती समोर आली आहे.
जंगलयुद्धात अतिशय सराईत असलेले नक्षलवादी पोलिसांसाठी सापळा रचताना नेहमी गनिमी पद्धतीचा वापर करतात. हे लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने नक्षलग्रस्त भागात शोधमोहिमा राबवणाऱ्या सुरक्षा दलांसाठी विशेष मानक कार्यपद्धती तयार केली आहे.
अलीकडच्या काही वर्षांत याचा काटेकोरपणे वापर करण्यात आल्याने नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये घट झाली होती. नक्षलवाद्यांनी पोलीस व सुरक्षा दलांसाठी रचलेले अनेक सापळे याच कार्यपद्धतीच्या वापरामुळे यशस्वी होऊ शकले नाही. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने नव्याने सर्व राज्यांना या कार्यपद्धतीचे पालन काटेकोरपणे करा, अशा सूचना दिल्या आहेत. जंगलात नक्षलवाद्यांचा माग काढताना मुक्कामाची वेळ आली तर एकाच ठिकाणाचा वापर सतत करू नये, असे या कार्यपद्धतीत स्पष्टपणे नमूद असूनसुद्धा गडचिरोलीत जवानांनी याकडे दुर्लक्ष केले. त्याचा फटका पोलिसांना बसला.
दोन वर्षांपूर्वीपर्यंत नक्षलग्रस्त राज्यातील सुरक्षा दले शोधमोहिमा राबवताना मुक्कामासाठी शाळांच्या इमारतींचा वापर करायचे. त्यामुळे नक्षलवाद्यांनी या इमारती उडवणे सुरू केले होते. यावरून मोठा गदारोळ उठल्यानंतर शाळांचा वापर करू नका, अशा सूचना सर्वत्र देण्यात आल्या होत्या. गडचिरोलीत जवानांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अपवादात्मक स्थितीत शाळेचा वापर केला तर हरकत नाही, असे अधिकाऱ्यांचे जवानांना सांगणे असते. मात्र गडचिरोलीत याकडेही जवानांचे दुर्लक्ष झाले.
मुक्कामाचे ठिकाण निश्चित केल्यानंतर त्याच्या सुरक्षेसाठी योग्य पद्धतीचा बंदोबस्त लावणे गरजेचे असते. हा बंदोबस्त कसा असावा, याविषयी मानक कार्यपद्धतीत बरीच माहिती देण्यात आली आहे. गडचिरोलीच्या घटनेत सापडलेल्या जवानांकडून हा बंदोबस्त लावण्यातसुद्धा चूक झाली, असे अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

गडचिरोलीत मोठा झेलिया गावात झालेल्या सुरुंग स्फोटाचा कट जहाल नक्षलवादी दिनकर व रावजी तुलावीने रचला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी या गावातील चार तरुणांना अटक केली आहे. या चौघांनी नक्षलवाद्यांना जंगलापासून शाळेच्या इमारतीपर्यंतची जमीन खोदण्यासाठी मदत केली होती. या खोदकामानंतर नक्षलवाद्यांनी सुरुंग लावला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दिनकर हा टिपागड दलमचा कमांडर आहे, तर तुलावी हा स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या दलमचा प्रमुख आहे. या दोघांनी आपल्या उपस्थितीत गावकऱ्यांकडून खोदकाम करून घेतले व सुरुंग लावून ठेवला, अशी माहिती अटकेतील तरुणांनी दिली आहे. गेल्या आठ महिन्यांत गडचिरोली पोलिसांनी २३ नक्षलवाद्यांना ठार केल्यामुळे नक्षलवादी खवळले होते. मात्र जवानांच्या सतर्कतेमुळे त्यांना या काळात एकही सापळा यशस्वी करता आला नाही. या पाश्र्वभूमीवर गेल्या आठवडय़ात झालेल्या घटनेमुळे पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी आता अधिक सावधगिरीने पावले टाकणे सुरू केले आहे.