मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या पदांबाबत निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाच्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात सुनेत्रा पवार, पटेल व तटकरे यांची बैठक होणार आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाला पाठविण्यात आलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल व सुनिल तटकरे यांना पदाधिकाऱ्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्या पत्रात पार्थ पवार यांची महासचिव आणि जय पवार यांचा राष्ट्रीय सचिव म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यातून पटेल व तटकरे आता पक्षाचे पदाधिकारी राहिलेले नाहीत. या प्रकारामुळे पटेल-तटकरे यांचे पक्षात नेमके स्थान काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणी माध्यमांमध्ये उलटसुलट बातम्या आल्यानंतर पार्थ पवार यांनी पटेल आणि तटकरे यांच्याशी दूरध्वनीव्दारे चर्चा केली. त्यातच तटकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने या चर्चेत आणखी भर पडली. तटकरे हे मूळ राष्ट्रवादीमध्ये परतण्याच्या मार्गावर असल्याच्या वावड्या उठल्या आहेत.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या गुहावटी येथे मंगळवारी झालेल्या शपथविधीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल पटेल आणि तटकरे उपस्थित होते. तेव्हा या पत्रावरून निर्माण झालेल्या वादावर तेथे प्राथमिक चर्चा झाली, असे राष्ट्रवादी मधील सूत्रांनी सांगितले. त्या पत्रातील नावे ही तांत्रिक चूक असून ती लवकरच दुरुस्त करण्यात येणार येईल, असे सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमावर स्पष्ट केले.

यासंदर्भात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची पुढच्या आठवड्यात मुंबईत बैठक होणार असून हा संभ्रम सुनेत्रा पवार दूर करणार असल्याचे समजते. या बैठकीत सर्व नेत्यांच्या संघटनात्मक जबाबदारीबाबत चर्चा करून मार्ग काढला जाईल. पटेल व तटकरे यांची नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने पक्षामध्ये प्रयत्न सुरू झाले आहेत.

पटेल आणि तटकरे यांनी पक्षातून अंग काढून घेतले असून मुंबई अध्यक्षासह पक्षातील अनेक नियुक्त्या रखडलेल्या आहेत. पार्थ पवार यांच्या कलाने राष्ट्रवादीची सध्या वाटचाल होत आहे. 29 एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांच्या सहीने पक्ष कार्यकारणीच्या 22 सदस्यांची जी नावे कळवण्यात आली, त्याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याचे समजते.