NCP Leaders Reaction on Merger: अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून हालचाली सुरू झाल्या. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवून त्यांना उपमुख्यमंत्रीपदी बसविण्यासाठी अजित पवार गटाचे प्रयत्न आहेत. तर शरद पवार गटाकडून विलीनीकरणाच्या चर्चेवर भर देण्यात येत आहे. दोन्ही पक्ष एकत्र यावेत, अशी अजित पवारांची इच्छा होती, असे शरद पवार यांनी आज सकाळीच सांगितले.

मात्र अजित पवार गटाकडून एकत्रीकरणाच्या चर्चेवर वेगवेगळे मुद्दे मांडले जात आहेत. यावरून विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडले असल्याचे दिसून येते.

आज सकाळी विलीनीकरणाबाबतचा प्रश्न अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना माध्यमांकडून विचारला गेला. यावर ते म्हणाले, या प्रश्नावर आज मला काही बोलायचे नाही. आज विधिमंडळ पक्षाची बैठक होत आहे. त्यानंतर आम्ही सविस्तर बोलू.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या आमदार आणि नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक शेख यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, आमच्या नेत्यांनी आम्हाला याबाबत काही सांगितले नाही. मागच्या दोन महिन्यात पक्षातील सर्व नेते निवडणुकीत व्यस्त होते. मात्र माध्यमातून एकत्रीकरणाची चर्चा होत राहिली. तसेच मागच्या दोन दिवसांपासून शरद पवार गटाकडून यासंबंधी विधाने केली जात आहेत. पण अशी काही चर्चा असेल तर आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पवार कुटुंब एकत्रितपणे याचा विचार करतील.

अजित पवारांच्या निधनामुळे विलीनीकरणाचा प्रश्न अनुत्तरीत

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे आणखी एक नेते अनिल पाटील यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, “विलीनीकरणाबाबत शरद पवार यांनी जे विधान केले आहे, त्यावर आमच्या पक्षातून उत्तर देण्यासाठी केवळ अजित पवारच सक्षम होते. ही चर्चा कदाचित त्यांच्याबरोबर झाली असती आणि त्यांनी आमच्याशी यावर चर्चा केली असती तर त्यातून समाधान निघाले असते. पण आता हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे.”

“उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची घाई वाटत असली तरी अजित पवारांचे निधन ही दुःखद घटना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सैरावैरा झाले आहेत. त्यामुळे कुणीतरी नेतृत्वाची धुरा सांभाळणे गरजेचे होते. तीन दिवसांचा दुखवटा पूर्ण झाला आहे. नेता निवडणे ही काळाची गरज आहे. विलीनीकरणाची चर्चा झालेली नाही. अजित पवारांच्या मनात असा कोणता विचार असेल तर त्यांनी आमच्या पक्षाच्या मंचावर त्यांनी तो विचार मांडला नव्हता”, असेही अनिल पाटील पुढे म्हणाले.

मावळचे आमदार सुनील शेळके या विषयावर बोलताना म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा आहे. विधीमंडळ पक्ष वेगळा आहे आणि संघटन वेगळे आहे. विधीमंडळ पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हातात दिल्यानंतर त्याच त्यासंबंधी निर्णय घेतील.