NCP Ajit Pawar Group : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राज्यात घडामोडींना वेग आला आहे. सध्या सर्वच पक्षांच्या नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. याच बरोबर महायुतीतील पक्षांमध्ये विधानसभेच्या जागावाटपाबाबतही खलबतं सुरु आहेत. मात्र, असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रुपाची चाकणकर यांचं नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे अजित पवार गटातील मतभेद समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट करत "एकाच महिलेला किती संधी देणार?", असं म्हणत सवाल उपस्थित केले आहेत. रुपाली पाटील-ठोंबरेंची फेसबुक पोस्ट काय? "एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार न्याय नक्की देतील, असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? कालपासून बातमी वाचत आहे. बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही, असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत. त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत. त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी. ही विनंती असेल", असं रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : Shrikant Shinde in Sangli: श्रीकांत शिंदेंकडून युतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा? खानापूरबाबत जाहीर कार्यक्रमात म्हणाले… रुपाली पाटील-ठोंबरेंची प्रतिक्रिया काय? "सध्या राज्यपाल नियुक्त आमदार निवडीसंदर्भातील चर्चा सुरु आहेत. मात्र, त्यासाठीचे नियम असे आहेत की, वकील, डॉक्टर यांच्यासह सामाजिक कार्यातील तज्ञ लोकांचा समावेश असावा. पण कालपासून काही बातम्या येत आहेत. त्या आमच्यासाठी धक्का देणाऱ्या आहेत. त्यामध्ये लोकशाही पद्धतीने कोणाचेही नावे आलेले नाहीत. आम्ही पक्षाकडे विचारलं तर पक्षाने सांगितलं की ही बातमी पक्षाची नाही. मग अशा पद्धतीच्या बातम्या येतात कुठून? विधानपरिषदेवर जाण्यासाठी कोणीही उत्सुक असू शकतं. मग मी देखील उत्सुक असू शकते. किंवा आमचे इतर कोणी पदाधिकारी असतील. माझं एवढंच म्हणणं आहे की, त्यांच्याकडे आधीच राज्य महिला आयोगाचं पद आहे. तसंच महिला प्रदेशाध्यक्ष पदही आहे. मग अशा पद्धतीच्या बातम्या येतात कुठून? या बातम्या कोण पेरतं? पक्षात अजूनही दुसऱ्या अनेक महिला आहेत त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. महायुतीमध्ये दुसऱ्या पक्षातील नावांची कुठेही चर्चा होत नाही. मग राष्ट्रवादीमधील नावं अशी चर्चेत कशी येतात?", असे अनेक सवाल रुपाली पाटील-ठोंबरे यांनी उपस्थित केले आहेत. त्या टिव्ही ९ मराठीशी बोलत होत्या. रुपाली चाकणकरांनी काय प्रतिक्रिया दिली? रुपाली पाटील-ठोंबरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, "त्यांच्या प्रश्नांवर आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या उत्तर देतील. मला वाटत नाही की त्यांचे प्रश्न हे उत्तर देण्यासारखे आहेत. आता मला हे सर्व प्रश्न तुमच्याकडून समजत आहेत. त्यामुळे याबाबत मला काहीही माहिती नाही. आमच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. त्यामुळे मी काहीही पाहिलेलं नाही. मी त्यांचे प्रश्न पाहते आणि माहिती घेते, त्यानंतर माहिती देते", अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.