Amol Mitkari On Maharashtra Cabinet Expansion : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. मात्र, भारतीय जनता पार्टी गृहखातं शिवसेनेला सोडण्यास तयार नसल्याचं बोललं जात आहे.
त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झाला नसल्याचीही चर्चा आहे. मग मंत्रिमंडळाचा विस्तार आता कधी होणार? कोणत्या पक्षाला कोणते खाते मिळणार? गृहखातं कोणत्या पक्षाकडे जाणार? या प्रश्नांची उत्तर आता मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच मिळणार आहेत. दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही? मंत्रिपदाचे घोडे कुठे अडले आहे? याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? गृहमंत्रिपद कोणाकडे जाईल? यावर आता अमोल मिटकरी यांनी मोठं भाष्य केलं आहे.
हेही वाचा : Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
अमोल मिटकरी काय म्हणाले?
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आधी ११ तारीख सांगितली, नंतर १२ तारीख सांगितली नेमकं कधी होणार? तसेच महायुतीत गृहमंत्री पद कोणाकडे जणार? काय ठरलंय? या प्रश्नावर बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “तुमच्या सूत्रांची माहिती वेगळी असेल. मात्र, माझ्या सूत्रांची माहिती अशी आहे की, सगळं ठरलेलं आहे. गृहखातं कोणाकडे असावं? कोणती खाते कोणाकडे असावे? यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची सविस्तर चर्चा झाली आहे. तसेच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नक्कीच होईल आणि योग्य खाते योग्य पक्षाला दिले जातील, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
गृहखात्याचा तिढा सुटला का?
महायुतीत गृहखात्यावरून तिढा असल्याची चर्चा आहे. गृहखात्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही असल्याचं बोललं जात आहे. मात्र, गृहखातं सोडण्यास भाजपा तयार नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे गृहखात्याचा तिढा सुटला आहे का? असा प्रश्न विचारला असता अमोल मिटकरी म्हणाले, “गृहखात्याचा तिढा सुटला आहे.” मग गृहखातं कोणाकडे असणार? असं विचारलं असता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.