Chhagan Bhujbal : राज्यात विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. मागील काही दिवसांपासून विविध मतदारसंघात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा आढावा आणि उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षात जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु आहेत.
यातच अजित पवारांनी रविवारी बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना मोठं विधान केलं होतं. “एकदा बारामतीकरांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा”, असं अजित पवारांनी म्हटलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी सूचक भाष्य केलं आहे. “अजित पवार हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत. ते निवडणूक लढवणार आहेत. असं मध्येच ते शस्त्र टाकू शकत नाहीत”, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?
“महायुतीमधील पक्षांना जर चांगलं यश मिळवायचं असेल तर मला वाटतं महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर कोणतेही विधान करू नये. कारण एकमेकांच्या विरोधातील विधानांमुळे विरोधी पक्षाला टीका करायला खाद्य मिळतं. शेवटी सर्वांचं लक्ष्य एकच आहे की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणणं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना सूचना दिल्या आहेत. आता निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे कोणीही काहीही विधाने करू नये, असं त्यांनी सांगितलेलं आहे”, असं छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
अजित पवार यांच्या निवडणुकीसंदर्भातील विधानाबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “अजित पवार हे निवडणूक लढवणार आहेत. शेवटी ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत. ते अशा प्रकारे मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत. मात्र, त्यांनी मांडलेली व्यथा ही काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत जे काही झालं त्याबाबत व्यथा आहे”, असं छगन भुजबळांनी सांगितलं.
अजित पवार काय म्हणाले होते?
बारामतीमधील एका कार्यक्रमात बोलातना अजित पवार म्हणाले होते की,”आता मीही ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. एकदा बारामतीकरांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा. मग तुम्ही ९१ ते २०२४ च्या माझ्या कारकिर्दीची आणि त्या नव्या माणसाच्या कारकिर्दीची तुलना करा”, अजित पवार म्हणाले होते.