Chhagan Bhujbal on Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे, तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी अनेकदा आंदोलन आणि उपोषणही केलं. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठकही झाली. मात्र, कोणताही तोडगा निघाला नाही. राज्य सरकारनेही अद्याप मनोज जरांगे यांच्या मागणीसंदर्भात ठोस असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. आता आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आणि ओबीसीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

‘मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर आपण विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करणार’, असा इशारा अनेकदा मनोज जरांगे यांनी दिला. आता यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना खुलं आव्हान दिलं आहे. “तुम्ही २८८ उमेदवार निवडणुकीत उभेच करा आणि ८ जागा निवडून आणून दाखवा”, असं आव्हान छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना दिलं. छगन भुजबळ आज सांगलीत ओबीसी मेळाव्यात बोलत होते.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस आरक्षण देणार नसतील तर त्यांच्याशी भांडण करावे लागेल – मनोज जरांगे पाटील

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

“राज्यात महायुतीच सरकार आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाहीच. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Maratha Reservation) देता येणार नाही. मनोज जरांगेंना यांना सांगा की मराठा समाजाला ओबीसीमधून कदापी आरक्षण मिळणार नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.

“मनोज जरांगे अनेकवेळा म्हणाले की, मराठा समजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर आम्ही २८८ उमेदवार उभे करणार आहोत. आहो आधी ८८ उमेदवार तर उभे करा आणि त्या उमेदवारामधून फक्त ८ उमेदवारच निवडून आणा. निवडणुकीच्या मैदानात या आणि निवडणुका लढवा. माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभेच करुन दाखवा”, असं खुलं आव्हान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे यांना दिलं.