राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईत पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकार्त्यांना काही महत्वाच्या सूचना देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २००४ साली मुख्यमंत्री पदाची आलेली संधी जर घेतली असती तर या महाराष्ट्रात आजपर्यंत राष्ट्रवादीला मागे वळून पाहायची गरज पडली नसती”, असं म्हणत सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

सुनील तटकरे काय म्हणाले?

“१९९९ ते २००४ मध्ये कालावधीत अजित पवार यांनी पक्ष संघटनेची चांगली बांधणी केल्यामुळे तेव्हा सर्वाधिक ७२ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपद चालून आलेलं होतं. ती मोठी संधी होती. युती किंवा आघाडी ज्यावेळी होते, त्यावेळी ज्या पक्षाचे सर्वाधिक जागा असतात त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. पण त्यावेळचा हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आणि या लोकसभा निवडणुकीत अनेक प्रश्नांची उकल झाली. छगन भुजबळ यांना जर मुख्यमंत्री केलं गेलं असतं तर पक्षात फूट पडली असती, असं आता सांगण्यात आलं. पण त्यावेळी सर्वाधिक मतं छगन भुजबळांना मिळाली आणि ते विधिमंडळ पक्षाचे नेते झाले. मग असं काय घडलं की छगन भुजबळांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्षात फूट पडली असती?”, असा सवाल सुनील तटकरे यांनी केला.

हेही वाचा : नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात एकही मुस्लीम चेहरा नाही, कॅबिनेटमध्ये केवळ ‘इतके’ अल्पसंख्यांक

अजित पवारांना मुख्यमंत्रीपद का नाकारलं?

“अजित पवार हे सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. ते आमदारही होते. त्यानंतर १९९९९ पासून २००४ पर्यंत मंत्री राहिले होते. मग तसं तर तुमचाही मंत्रीपदाचा सात वर्षांचा अनुभव होता. मी शरद पवार यांच्याबाबतचा आदर व्यक्त करून येथे सांगतो, शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनाही मंत्री‍पदाचा ७ वर्षाचा अनुभव होता आणि अजित पवार यांनाही ७ वर्षांचा अनुभव होता. मग तरीही अजित पवारांना मुख्यमंत्रीपद का नाकारलं? खरं तर अनुभवाचा प्रश्न येत नाही. पण त्यांना अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंच नव्हतं. राष्ट्रवादीला आलेली मुख्यमंत्रीपदाची संधी जर घेतली असती राष्ट्रवादी पक्षाला महाराष्ट्रात कधी मागे वळून पाहावं लागलं नसतं”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी विश्वासघात केला असं आता म्हणतात. मग २०१९ मध्ये शिवसेना ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टीला जनतेने कौल दिला होता. त्यांचं बहुमतात सरकार येत होतं. असं असतानाही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. मग आता अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली असं म्हणता येणार नाही”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.