scorecardresearch

“राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा…”, अजित पवारांचं मनसेप्रमुखांवर टीकास्र, ‘त्या’ मुलाखतीचाही केला उल्लेख!

अजित पवार म्हणतात, “राज ठाकरेंचे आरोप हे धादांत बिनबुडाचे आणि हास्यास्पद आहेत. माणसानं इतकंही…!”

“राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा…”, अजित पवारांचं मनसेप्रमुखांवर टीकास्र, ‘त्या’ मुलाखतीचाही केला उल्लेख!
अजित पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला!

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरेंनी शरद पवारांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच जातीपातीचं राजकारण होत आहे, असा आरोप पुन्हा एकदा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या या आरोपांवरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अदित पवार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांवरून टोला लगावला आहे. तसेच, त्यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखतीचाही उल्लेख अजित पवारांनी केला आहे.

“राज ठाकरेंचा आरोप हास्यास्पद”

प्रसारमाध्यमांशी यासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “शरद पवारांना महाराष्ट्र ५५ वर्ष ओळखतोय. ५५ वर्ष शरद पवार राजकारण करत आहेत. त्यांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवला. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम केलं. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब आहे. त्यात नखभरही तथ्य नाही”, असं अजित पवार म्हणाले.

“काळ बदललाय, सगळंच तुमच्या…”, राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर!

“माणसाने इतकंही दुटप्पी वागू नये”

“राज ठाकरेंचा आरोप धादांत बिनबुडाचा आहे. शरद पवारांचं नाव घेतलं तर ती बातमी होते. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य वाटत नाही. हेच राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेत होते, तेव्हा त्यांच्याबद्दल काय बोलत होते? इतकं दुटप्पीही माणसाने वागू नये”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरे नुकतेच कोकण दौऱ्यावर गेले असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात भूमिका मांडली. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासूनच राज्यात जातीपातींचं राजकारण सुरू झाल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले. अशाच प्रकारची भूमिका राज ठाकरेंनी याआधीही अनेकदा मांडली असून त्यावरून मनसे आणि राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये सातत्याने दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 10:40 IST

संबंधित बातम्या