कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमय्या यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांवर दावा करण्याची तयारी केली असल्याचं सांगितल्यानंतर आता आणखी एक विधान केलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिलं असून सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नडभाषिक भाग आमच्यात समाविष्ट केले पाहिजेत असा दावा केला आहे. यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त होत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून महाराष्ट्र असा-तसा वाटला का? अशा शब्दांत सुनावलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार काय म्हणाले?

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून गेल्या दोन दिवसांत जी काही विधानं आली आहेत, त्यांचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो. ते काय महाराष्ट्र मागायला निघाले आहेत का? त्यांना काय महाराष्ट्र असा तसा वाटला का? कारण नसताना सांगलीतील जत तालुक्यासंबंधी त्यांनी विधान केलं. आणि आता सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गावांसदर्भात विधान केलं आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

“तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही,” कर्नाटकमधील भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांना जाहीर आव्हान, म्हणाले “सोलापूर, अक्कलकोटही…”

पुढे ते म्हणाले की “काही संबंध नसताना अशा प्रकारची वक्तव्यं करायची आणि लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांना कडक शब्दांत समज दिली पाहिजे. शेवटी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री भाजपाचे आहेत”.

“याआधी अशी विधानं होताना दिसत नव्हती. आता तर फक्त मुंबईच मागायची राहिली आहे. महाराष्ट्रातील जनता हे अजिबात सहन करणार नाही. त्यांनी अशी वक्तव्यं करण्याच्या भानगडीत पडू नये. केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. तिथे आपापली भूमिका मांडल्यानंतर निर्णय होईल. पण असा सतत सांगली, सोलापूरचा उल्लेख कऱणं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थांबवलं पाहिजे,” असा इशाराच अजित पवारांनी दिला आहे.

“बेरोजगारी आणि महागाईवरुन लक्ष हटवण्यासाठी हा सगळा कार्यक्रम सुरु आहे. अशा प्रकारची वक्तव्यं केली की मीडियाही तेच दाखवतं. राज्याच्या अस्मितेचा, एकतेचा प्रश्न असल्यानं सर्वांना बोलावं लागतं. पण आता कारण नसताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असं विधान केल्याने त्यांच्या अंगात काय संचारलं आहे हे तपासण्याची वेळ आली आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.

“जत आणि अक्कलकोट तालुक्यातील गावांवरचा दावा त्यांच्यासाठी ‘खयाली पुलाव’ ठरेल. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातली 814 मराठीभाषक गावं महाराष्ट्रात येणं हा खरा मुद्दा आहे. ही गावं महाराष्ट्रात आल्यानंतरच संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीनं लढेल,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री ट्वीटमध्ये काय म्हणाले आहेत?

“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केलं असून, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

एकही गाव राज्याबाहेर जाऊ देणार नाही!; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा अमान्य

पुढे ते म्हणाले की “कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतीही जागा देण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नडभाषिक भाग आमच्या राज्यात समाविष्ट केले पाहिजेत”.

“२००४ पासून महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत त्यांना यश आलेलं नाही आणि मिळणारही नाही. आम्ही कायदेशीर लढ्यासाठी तयार आहोत,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

फडणवीस काय म्हणाले होते?

जत तालुक्यातील काही गावांच्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव केल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. बोमय्या यांनी मंगळवारी केला होता. मात्र, राज्य सरकारने तो फेटाळून लावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. ‘सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर आणि त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्ये केली असतील. पण आम्ही सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडून बेळगाव-कारवार-निपाणीसह आमची गावे मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत,’ असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar on karnataka cm basavaraj somappa bommai statement over border issue bjp devendra fadnavis sgy
First published on: 24-11-2022 at 12:03 IST