राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच असं सांगत काँग्रेस- राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा देणाऱ्या भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उत्तर दिलं असून आमच्याकडे कुणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही असं सांगत प्रत्युत्तर दिलं आहे. विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. आपल्याकडचाच कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही याची काळजी घ्या असा टोलाही त्यांनी लगावला.

अजित पवार यांनी काय म्हटलं ?
“राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईल अंस म्हणत पुढची पाच वर्ष तिथं काढलीत तरी चालतील. असं सांगतंच तुम्हाला सगळं सांभाळून घ्यावं लागणार आहे. नाही तर तुमचीच माणसं इकडे तिकडे जातील. आमच्याकडे कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तुमच्याकडे होणार नाही याकडे लक्ष ठेवा. बरेच जण गैरहजर आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा,” असा चिमटा अजित पवार यांनी यावेळी काढला.

सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आपल्या शपथविधीवर बोलताना जे केलं ते मान्य आहे. मी लपून करत नाही, समोर करतो. तिथंही केलं, तिथंही सोडलं…इथं आल्यावरही मजबूत बसलो आहे असं अजित पवारांनी यावेली सांगितलं. सुधीर मुनगंटीवार कितीही म्हणले चुकी झाली तरी आता माफी नाही असं सांगत अजित पवार यांनी शिवसेना-भाजपा युतीची शक्यता फेटाळून लावली.

आणखी वाचा- शिवसेनेला फसविले ही आमची चूकच!

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले होते ?
राज्यातील शिवसेना- भाजप युती नेमकी कशामुळे तुटली, कोणी कोणास फसविले याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर गुरुवारी विधानसभेत पूर्णविराम मिळाला. होय, आम्ही शिवसेनेला फसविले. कधी ना कधी आम्ही ही चूक सुधारू, अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी युतीत कोणी कोणाला फसविले याची स्पष्ट कबुली दिली. आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच असे सांगत काँग्रेस- राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा दिला.

आणखी वाचा- मोठया घरची पोरं रातोरात गांधींच्या मांडीवरुन गोडसेंच्या मिठीत विसावतात – जितेंद्र आव्हाड

आम्ही शिवसेनेला फसविले, पण तुम्ही याचा एवढा गैरफायदा घेऊ नका असे त्यांनी राष्ट्रवादी- काँग्रेसला सुनावले. एवढेच नव्हे तर तुमचे तीन महिन्यापासूनचे संबंध असून आमचे ३० वर्षांचे संबंध असून महाविकास आघाडी सरकारचे आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या सरकारचे १०० अपराध पूर्ण झाल्यानंतर हे सरकार कोसळेल, असे भाकीतही त्यांनी यावेळी वर्तविले.