राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आल्यापासून भाजपाकडून ते कधी पडेल याचे मुहूर्त दिले जात आहेत. त्यात तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचे देखील दावे अनेकदा केले जातात. यापैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद नुकत्याच पार पडलेल्या भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद सभापती निवडणुकांदरम्यान चव्हाट्यावर आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून काँग्रेसनं पाठीत खंजीर खुपसल्याची भावना व्यक्त केली होती. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोलेंना शेलक्या शब्दांत सुनावतानाच त्यांच्या विधानावर टीका देखील केली आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले?

“मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू”, असं ट्वीट नाना पटोले यांनी केलं आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
महायुतीचं सरकार टिकणार नाही? अजित पवार गटातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ; भाजपा नेत्याला म्हणाले, “मी सुरूंग लावून…”
BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
Gujarat Congress chief Arjun Modhwadia joins BJP and attacks on congress leader
“पक्ष चालवणं म्हणजे अर्धवेळ नोकरी नव्हे”; गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडताना दिल्या कानपिचक्या!

“नाना पटोलेंचं विधान हास्यास्पद”

नाना पटोलेंच्या टीकेवर अजित पवारांना आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तोंडसुख घेतलं आहे. “काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एक वक्तव्य केलं की पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. वास्तविक नानांचं ते वक्तव्य हास्यास्पद वाटतं. कारण नानाच मागे कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले ते तुम्हाला माहिती आहे. ते भाजपामध्ये होते. मग आता भाजपानं म्हणायचं का की पाठीत खंजीर खुपसून ते तिकडे गेले. हे तेवढ्यापुरतं हेडलाईन मिळवण्यासाठी पाठीत खंजीर खुपसणं वगैरे वाक्य कदाचित त्यांना बरं वाटत असेल”, असं अजित पवार म्हणाले.

“काँग्रेसचं देखील भाजपासोबत संधान”

दरम्यान, काँग्रेसनं देखील काही तालुक्यात, जिल्ह्यात भाजपासोबत संधान बांधलं आहे, असा खळबळजनक दावा अजित पवार यांनी केला. “संघटनेमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या परीने काम करत असतो. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस काम करतंय. मागेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काम करायचं. पण राज्य, राष्ट्रीय पातळीवरचे नेते निर्णय घेत असतात. जिल्ह्यात अनेकदा वेगळ्या घटना घडतात. वातावरण योग्य राहण्यासाठी आघाडीतल्या पक्षांमध्ये समन्वय असला, तर हे प्रश्न निर्माण होत नाही. काँग्रेसनं देखील काही तालुक्यात, जिल्ह्यात भाजपासोबत संधान बांधलं आहे. मी त्याला फार महत्व देऊ इच्छित नाही. पण जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करताना आपल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ निघून वेगळा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी”, अशा शब्दांत अजित पवारांनी नाना पटोलेंना सुनावलं आहे.

“नाना पटोले पूर्वी काँग्रेसमध्ये होते, तिथून भाजपात गेले, भाजपा सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. कशाला बोलायचं. झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी”, असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

“तिन्ही पक्ष एकत्र आले तरच बहुमताचा आकडा”

“काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आत्ताच्या परिस्थितीत हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतरच बहुमताचा १४५ हा आकडा गाठता येतो आणि याची नोंद सर्वांनीच घ्यावी. त्याबद्दल राज्य स्तरावर आमची शरद पवारांनी बैठक घेतली होती. त्यात आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठेवायची असल्याचं त्यांनी सांगितलं. पण जिल्हा स्तरावर वेगळे प्रश्न असतील तर स्थानिक नेते -पदाधिकाऱ्यांना काही प्रमाणात मुभा देण्यात आली आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी नाना पटोलेंना सूचक इशारा दिला आहे.

“त्यांनीही राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्याकडे घेतलेत. आम्ही दोघांनी मिळून १९९९ ते २०१४ अशी १५ वर्ष आघाडीचं सरकार चालवलं. त्या काळातही काही जिल्ह्यात आम्ही एकमेकांविरोधात निवडणुका लढवायचो. एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घ्यायचो. जर एखादी व्यक्ती राष्ट्रवादी सोडून दुसऱ्या पक्षात जाणार असेल, इतर ठिकाणी जाऊन विरोधी पक्षाची ताकद वाढणार असेल, तर त्यापेक्षा आमच्या मित्रपक्षांकडे गेली तर त्यात वाईट वाटण्याचं कारण नाही. आपली आघाडी एकजूट राहिली पाहिजे”, असंही अजित पवार म्हणाले.