"सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या बहाद्दर आमदारांनो..." सीमावादावरुन अमोल मिटकरीं शिंदे गटाला डिवचलं | ncp amol mitkari challenge eknath shinde group to go karnataka by belgaon tweet rmm 97 | Loksatta

“सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या बहाद्दर आमदारांनो…”, सीमावादावरुन अमोल मिटकरीं शिंदे गटाला डिवचलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाला खुलं आव्हान दिलं आहे.

“सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या बहाद्दर आमदारांनो…”, सीमावादावरुन अमोल मिटकरीं शिंदे गटाला डिवचलं
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगितला आहे. बोम्मई यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. तसेच सीमावादाप्रकरणी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. सीमावादावर बोलणं त्यांनी टाळलं आहे.

हेही वाचा- “शरद पवार तिकडे जाऊन काय दिवे लावणार?” सीमावादावरून विजय शिवतारेंचा खोचक टोला

या सर्व घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाला खुलं आव्हान दिलं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही सुरतमार्गे गुवाहाटीला गेला, त्याप्रमाणे बेळगावमार्गे कर्नाटकात जाऊन याच, असं मिटकरींनी म्हटलं आहे. त्यांनी ट्वीट करत शिंदे गटाला डिवचलं आहे.

अमोल मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या महाराष्ट्रातील बहाद्दर आमदारांनो… महाराष्ट्र संकटात आहे. हिंदुत्व धोक्यात आहे. हिंमत दाखवा आणि बेळगावमार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच…” असं आव्हान मिटकरींनी दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 23:43 IST
Next Story
“सत्यजित तांबेंना संधी द्या, नाहीतर…”, बाळासाहेब थोरातांसमोर देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी