scorecardresearch

“हा त्याच्या पक्षाला एक दिवस आग लावून त्याच भट्टीवर…”, अमोल मिटकरींचा गोपीचंद पडळकरांना टोला!

मिटकरी म्हणतात, “याचं म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखं आहे. पवारांचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी…!”

amol mitkari and gopichand padalkar
फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम

बारामतीमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि विशेषत: पवार कुटुंबीयांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या काही महिन्यांत पडळकरांनी आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे. रविवारी एका जाहीर सभेत बोलताना गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य केलं. तसेच, हर्षवर्धन पाटलांना बारामतीमधून लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचं तिकीट मिळण्याचा अप्रत्यक्ष उल्लेखही त्यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. पडळकरांनी पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आता खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले पडळकर?

गोपीचंद पडळकरांनी बारामतीमधून भाजपाला तिकीट मिळणारी व्यक्ती भाग्यवान असेल, असं विधान केलं आहे. “बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. बोलावंच लागेल. हर्षवर्धन पाटील इथं आहेत. ते आज आपलं नेतृत्व आहेत. बारामतीच्या लोकसभा मतदारसंघातून पक्ष कुणाला तिकीट देणार हे मला माहिती नाही. पण ज्याला कुणाला तिकीट मिळेल, तो भाग्यवान असेल. कारण पवारांना पाडून संसदेत जाण्याची संधी त्याला मिळणार आहे”, असा उल्लेख पडळकरांनी केला.

तसेच, “मान चांगलं नव्हतं, माझं डिपॉझिट गेलं. मी असा आहे की भाजपानं मला टार्गेट दिलं आणि तिथं नेऊन बसलं. परत मी शरद पवारांच्या मानगुटीवर जाऊन बसलो”, असंही पडळकर म्हणाले.

दरम्यान, यावर अमोल मिटकरींनी ट्विटरच्या माध्यमातून खोचक टीका केली आहे. गोपीचंद पडळकरांचा एकेरी उल्लेख करत मिटकरी ट्वीटमध्ये म्हणतात, “हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे. पवारांचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा. याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही. हा त्याच्या पक्षाला एक दिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल”, असं मिटकरींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अमरावतीतील एका बाबाच्या कृत्याने खळबळ, चक्क गरम तव्यावर बसून भक्तांना दिला आशीर्वाद

अमरावतीतील ‘त्या’ बाबाचा संदर्भ?

दरम्यान, अमोल मिटकरींनी आपल्या ट्वीटमध्ये अमरावतीतील एका बाबाचा संदर्भ घेतल्याचं बोललं जात आहे. गरम तव्यावर बसून भक्तांवर आरडाओरड करणाऱ्या एका बाबांची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. संत गुरुदास महाराज असं या बाबांचं नाव असून मार्डी येथे या बाबांचा आश्रम आहे. महाशिवरात्रीच्या कार्यक्रमातला एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात बाबा आरडा-ओरड करत असल्याचं दिसत आहे. याच बाबांचा संदर्भ मिटकरींनी पडळकरांवर टीका करण्यासाठी घेतल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 12:19 IST

संबंधित बातम्या