राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विदर्भात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. शरद पवार यांच्यासहित एकनाथ खडसे, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, अमोल मिटकरी हेदेखील मंचावर उपस्थित होते. यावेळी भाषणांमधून नेत्यांनी विदर्भात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी नारा दिला. दरम्यान यावेळी अमोक मिटकरी यांनी भाषण करताना विरोधकांवर जोरदार टीका केली. तसंच सिल्व्हर ओकवर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक काही आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला तसंच दगडफेक केली. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेससोबतच भाजपाकडून देखील या घटनेविषयी खंत व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान अमोल मिटकरी यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केला आहे.

“विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठी संधी आहे. आपल्यात २६ आमदार निवडून आणण्याची ताकद आहे, त्यासाठी काम केलं पाहिजे. विरोधक आपला अजेंडा राबवत आहेत. खोटं बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत. एखादी गोष्ट १०० वेळ सांगितली की खरी वाटू लागते असं सूडाचं षडयंत्र भाजपाचं सुरु आहे. एकत्र येऊन शरद पवारांच्या पाठीशी उभं राहावं लागेल,” असं आवाहन अमोल मिटकरी यांनी यावेळी केलं.

“मद्यधुंद अवस्थेतील काही लोक आपलं श्रद्धास्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर सोडले गेले. ज्या वकिलांनी कोर्टात वकिली केली पाहिजे ते वकील तिथे वकिली करु लागले. निष्पाप लोक होते त्यांना आत टाकलं आणि जे खोटे आहेत ते सरकारविरोधात, शरद पवारांविरोधात सातत्याने बोलत असतात. याविरोधात हल्ला करण्यासाठी आपण कुठे कमी पडत आहोत का याचं चिंतन झालं पाहिजे,” असंही अमोल मिटकरी म्हणाले.

भाजपा नेते अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्याचाही यावेळी समाचार घेतला. “अनिल गोंडेंचा मी निषेध करतो. बोडें तुम्ही पंजा कापण्याची भाषा करता. तुम्ही तहसीलदाराच्या कानाखाली लावली म्हणून तीन महिन्याची जेल झाली. त्यांच्यात भाच्याने आमचे मामा दुपारी ३ नंतर कोणत्या अवस्थेत हे अमरावती जिल्ह्याला माहिती आहे असं सांगितलं आहे. आमची बरोबरी करण्यापेक्षा हिटलरला आत्महत्या कशी करावी लागली होती त्याबद्दल वाचा. बोलताना सभ्यता सोडून बोलतात तेव्हा आपलीदेखील जबाबदारी असते,” असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

“नरेंद्र मोदींनीही आपण शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आल्याचं म्हटलं होतं. शरद पवारांच्या पक्षातील लोकं आपण आहोत. त्यांची जागा दाखवण्यासाठी वज्रमूठ बांधा,” असंही मिटकरी म्हणाले.