मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावूच, असा निर्वाणीचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला. शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरून लक्ष्य ठरलेल्या राज ठाकरे यांची मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी यावर ट्विट करत टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राज्यात जातीयवाद बोकाळला, या वक्तव्याचा राज यांनी पुनरुच्चार केला. ‘‘शरद पवार हे नेहमीच आपल्या भाषणात महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे, असे म्हणतात. पण, त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मुसलमानांची मते मिळणार नाहीत, या भीतीने पवार छत्रपतींचे नाव घेत नाहीत’’, अशी टीका राज यांनी केली. त्यामुळे छत्रपतींच्या नावाने राजकारण करण्यासाठी आणि माथी भडकाविण्यासाठी राष्ट्रवादीने संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांची निर्मिती केल्याचा आरोपही राज यांनी यावेळी केला.

अमोल मिटकरीचं ट्वीट –

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर झालेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ही सभा घेतली होती. यावरुन अमोल मिटकरी यांनी टोला लगावत आता पुरवणी सभा घ्या म्हटलं आहे.

“जहिर सभा”, “उत्तर सभा” आता वाट “पुरवणी सभेची”. सभेत फक्त आणि फक्त मनोरंजन आणि प्रश्नच प्रश्न…वाऱ्याला लाथा मारणारी पुरवणी सभा झालीच पाहिजे. प्रश्न राष्ट्रवादीचे उत्तर BJP च्या C टीमचे,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

राज ठाकरे आणखी काय म्हणाले –

‘शरद पवार हे स्वत: नास्तिक आहेत. ते धर्म, देव मानत नाहीत. या पद्धतीनेच ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतात़ त्यामुळे मी जातीवाद भडकवतो आणि भूमिका बदलतो, यावर पवारांनी बोलावे का, असा सवाल राज यांनी केला़ विदेशी व्यक्ती पंतप्रधान नको, या मुद्यावर शरद पवार हे १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर मात्र ते काँग्रेसबरोबर जाऊन कृषीमंत्री झाले. पवारांनी आतापर्यंत असंख्य भूमिका बदलल्या, असेही राज म्हणाल़े हिंदूत्वाचा मुद्दा मनसेने आधीपासूनच घेतला होता, असे सांगत राज यांनी पाकिस्तानी कलाकारांविरोधातील भूमिका आणि रझा अकादमीविरोधातील सभेची आठवण करून दिली.

सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहेत, अशी टीका राज यांनी केली़ अजित पवार यांच्यावर छापेमारी होते, पण, सुप्रिया सुळे यांच्यावर अशी कारवाई होत नाही़ आपल्याच पक्षातील नेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पवार हे मोदींना भेटत तर नसावेत ना, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘‘पवार खूश झाल्यावर भीती वाटते, हे मी यापूर्वीच म्हणालो होतो. संजय राऊत यांच्यावर पवार आता खूश आहेत. त्यामुळे ते त्यांना कधी टांगतील हे कळणार नाही,’’ असे राज म्हणाल़े

‘‘ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅ्क बदलला असा माझ्यावर आरोप होत आहे. पण, पण मी ट्रॅ्क बदललेला नाही. कोणत्याही नोटिसा येऊद्या, मी त्यांना भीक घालत नाही’’ असेही ते म्हणाले. तसेच उद्या नरेंद्र मोदींनी काही चुकीच केले तर मी परत त्यांच्याविरोधात बोलेन, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यावरही टीका केली.

‘हा सामाजिक विषय’

भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांना भोंग्याच्या आवाजाचा त्रास होतो. सण आणि उत्सवाच्या काळात आम्ही समजू शकतो. आम्ही गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिक्षेपक लावतो. पण तेही खरेतर चुकीचे आहे. परंतु मशिदीवरच्या भोंग्यातून ३६५ दिवस बांग सुरू असते. या भोंग्यांचा संपूर्ण देशाला त्रास होत आह़े अजान आणि नमाज घरात अदा करा, रस्ते आणि पदपथ कशासाठी अडवता, असा सवालही त्यांनी केला. हनुमान चालिसा लावणे हा केवळ भात्यातला एक बाण आहे. दुसरे बाण अजून आहेत आणि ते मला काढायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

‘समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रणाची गरज’

‘‘काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर सर्वप्रथम मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होत़े. आता मोठय़ा बहुमताचा फायदा घेत मोदींनी देशात समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.