राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास महिन्याभराने पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. या विस्तारामध्ये एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली असून त्यात भाजपाचे ९ तर शिंदे गटाच्या ९ आमदारांचा समावेश आहे. नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्यासंदर्भात अनेकांची नावे चर्चेत होती. यामध्ये अगदी पंकजा मुंडेंपासून रवी राणांपर्यंत सर्वांचा समावेश होता. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात हनुमान चालीसावरून रान पेटवणारे रवी राणा यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार असं बोललं जात होतं. मात्र, त्यांचा समावेश न झाल्यामुळे त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात ट्विटरवर खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठनाच्या मुद्द्यावरून जोरदार मोहीम उघडली होती. अगदी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच हनुमान चालीसा पठन करण्याचा देखील त्यांनी घाट घातला होता. मात्र, त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमवीर रवी राणा यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र, तो अंदाज फोल ठरला.

अमोल मिटकरींचं खोचक ट्वीट

यासंदर्भात ट्वीट करताना अमोल मिटकरी यांनी रवी राणा वैफल्यग्रस्त झाल्याचं म्हटलं आहे. “हिंदुत्वासाठी जिवाचं रान करणारे रवी राणा, हनुमान चालीसा खिशात घालून फिरणारे रवी राणा अखेर वैफल्यग्रस्त झाले आहेत”, असं मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

या ट्वीटमध्ये मिटकरींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील उल्लेख केला आहे. तसेच, रवी राणा यांना मंत्रीपद मिळायलाच हवं, अशी खोचक शब्दांत मागणी देखील केली आहे. “देवेंद्र फडणवीस ठरवतील त्यांना मंत्रीपद मिळतं, याचा अर्थ त्यांना (रवी राणा) नव्याने ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज आहे. रवी राणा यांना धर्म रक्षणार्थ मंत्रीपद मिळायलाच हवे”, असं अमोल मिटकरींनी नमूद केलं आहे.

राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर सत्तेतील काही मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. बच्चू कडू यांनी ती माध्यमांसमोर बोलून देखील दाखवली होती. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बच्चू कडूंना चांगलं खातं मिळेल, असं म्हटलं आहे. तसेच, पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर अर्थात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसरा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.