मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला वर्धापन दिन गुरुवारी किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये मोठ्या झोकात पार पडला. २७ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात पक्षाच्या वाटचालीसदंर्भात चिंतन वगैरे झाले नाही. उलट ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या भाषणातून पक्ष नेतृत्वाला कानपिचक्या, इशारे आणि टोमणे मारण्यात धन्यता मानली.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या भाषणातून अजित पवार यांनी राष्ट्रवादी उभी करण्यासाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. २००४ मध्ये राष्ट्रवादीने अधिक जागा मिळवूनही मुख्यमंत्रीपद सोडल्याची खंत व्यक्त केली. जाता जाता तटकरे यांनी पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांना ‘विश्वासाचे राजकारण करा’ असा सल्ला दिला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रीपद गमावलेल्या धनंजय मुंडे यांनी किती काळ १२ वा खेळाडू म्हणून वाट पाहायची, अशी पक्षनेतृत्वाला मंत्रीपदाबाबत विचारणा केली. शरद पवार यांनी १९९९ मध्ये काँग्रेस सोडली तेव्हा मला काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची विचारणा केली होती. पण पक्ष सोडला नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. राजकारणात संधी सर्वांना मिळते, तिचे सोने करायची की माती हे ज्याने त्याने ठरवायचे. पक्ष म्हणजे नेतृत्व नसून कार्यकर्त्यांचा समूह होय, अशी टीपण्णी भुजबळ यांनी केली.

२७ वर्षांमध्ये पक्षाने महाराष्ट्राबाहेर संघटन उभारले. पक्षाला पुन्हा राष्ट्रीय मान्यता मिळवावी लागेल. बोलून पक्ष वाढणार नाही. पक्ष ग्रामीण भागात आहे, मात्र मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये शहरी भागाला महत्व येणार आहे. त्यासाठी कार्यक्रम आखला पाहिजे, अशी सूचना राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केली.

भुजबळ यांची राज्यसभेची संधी गमावल्यानंतर मागच्या आठवड्यात ‘आपण कबड्डीपटू आहोत, बुद्धीबळपट्टू नाही’ असे त्यांनी विधान केले होते. तसेच तटकरे कुटुंबियांना दोन्हीकडे लाभ मिळाल्याचे ते म्हणाले होते. तो धागा पकडत सुनील तटकरे यांनी ‘भुजबळ हे कोपरा रक्षक आहेत. सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व मजबूत करण्यासाठी ८० वर्षाचे तरुण भुजबळ आता मैदानात उतरले आहेत, असा टोमणा मारला. त्यावर ‘खेळात राजकारण नको आणि राजकारणाचा खेळ करु नका’ असा पलटवार भुजबळ यांनी आपल्या भाषणामध्ये केला.

१. व्यासपीठावर पहिल्या रांगेत पार्थ आणि जय पवार यांना स्थान होते. पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या डाव्या-उजव्या बाजुला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या खुर्च्या होत्या. पण तीन तासात त्यांच्यामध्ये क्वचित संवाद झाला.

२. वर्धापन दिनाचे नियोजन खासदार पार्थ पवार यांच्याकडे होते. अजित पवार यांच्या सावलींमधून पक्ष आणि कार्यकर्ता अजूनही बाहेर आला नसल्याचे दिसले. सर्व वक्त्यांची भाषणे अजित पवारांच्या आठवणींचीच होती.