scorecardresearch

“महाराष्ट्राची सुटका झाली” भगतसिंह कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर शरद पवार म्हणाले, “… तर चौकशी झाली पाहीजे”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला.

Sharad Pawar on BhagatSinh Koshyari Governor
शरद पवार यांची भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राज्यभरातून विरोधी पक्षाचे नेते आनंद व्यक्त करत आहेत. राज्यात राज्यपालांच्या जाण्याने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राज्यपालांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, “माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. अतिशय चांगला निर्णय. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती कधीही राज्यपाल म्हणून झाली होती, ती आपण पाहिली. केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी त्यात बदल केला, ही समाधानकारक बाब आहे.”

हे वाचा >> अग्रलेख : राजभवनातील राधाक्का!

संविधानाच्या विरोधात काम झाले असेल तर

शरद पवार यांनी याआधी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कडक शब्दात टीका केलेली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणारे वक्तव्य शरद पवार एकाच व्यसपीठावर असताना उद्गारले होते. त्यानंतर शरद पवार यांनी देखील त्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता राजीनामा मंजूर झाल्यानंतर पत्रकारांनी शरद पवार यांना राज्यपालांनी संविधान विरोधी जे निर्णय घेतले होते, त्याचे काय होणार? असा प्रश्न विचारला. यावर शरद पवारांनी सांगितले, “जर संविधानाच्या विरोधात काही झाले असेल तर त्याची चौकशी झाली पाहीजे.”

हे वाचा >> रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; वाजपेयी-अडवाणी यांचे निकटवर्तीय, ७ वेळा खासदार, अशी आहे कारकिर्द

याआधी देखील शरद पवार यांनी राज्यपालांवर टीका केली होती. मागच्या महिन्यात जेव्हा राज्यपालांनी परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा देखील शरद पवार यांनी मिश्किल शब्दात त्यांना टोला लगावला होता. “ते राज्यपाल पदावर दुःखी असतील, तर आम्हीही सगळे दुःखीच आहोत. महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या राज्यात लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे अनेक नावं यात घेता येतील. अतिशय उच्च दर्जाचे व्यवहार असणारे लोक महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून मिळाले. महाराष्ट्रात जे जे राज्यपाल झाले त्यांनी पक्ष कोणताही असो, पण राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले आणि घटना आबाधित ठेवली. हे पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. त्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागते,” अशी टीका शरद पवार यांनी केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 11:47 IST
ताज्या बातम्या