लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुतीची मोठी पीछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. खुद्द भारतीय जनता पक्षाच्या जागा २३ वरून थेट ८ पर्यंत खाली आल्या. त्याउलट एकनाथ शिंदे गटाला ८ जागा मिळाल्या. अजित पवार गटानं लढवलेल्या चार जागांपैकी फक्त एका जागेवर त्यांचा विजय झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या मिळून ३१ जागा निवडून आल्या. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असताना शरद पवारांनी साताऱ्यात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर बोलताना मोठं विधान केलं आहे. शरद पवार रविवारी साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमोर बोलताना शरद पवारांनी काही महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांना अवघ्या तीन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक राहिलेला असताना सर्वच पक्षांनी त्याअनुषंगाने कंबर कसलेली आहे. त्यात शरद पवार गटाचे ८ खासदार निवडून आल्यामुळे त्यांची महाराष्ट्रातील ताकद वाढल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सर्व ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे. त्यात शरद पवारांनी साताऱ्यात केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. साताऱ्यात लोकसभेचं काय झालं? सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून उदयनराजे भोसले यांना तिकीट देण्यात आलं होतं. गेल्या निवडणुकीत तत्कालीन एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभूत झाल्यानंतर उदयनराजे भोसलेंना भाजपानं राज्यसभेची उमेदवारी दिली होती. मात्र, यंदा पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसलेंना तिकीट दिल्यानंतर त्यांचा विजय झाला. त्यामुळे साताऱ्यात शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत अधिक जोर लावावा लागणार असल्याचं स्पष्ट झालं. या पार्श्वभूमीवर खुद्द शरद पवारांनी भेटी-गाठी सुरू केल्या आहेत. काय म्हणाले शरद पवार? शरद पवारांनी यावेली कार्यकर्त्यांना आवाहन केलं. "तुम्हाला एवढंच सांगतो. तुम्ही एकत्र राहा, तुम्ही कसे निवडून येत नाही हे मी बघतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने इथली निवडणूक आपण जिंकू", असं शरद पवार यावेळी म्हणाले. “अधून-मधून वारीला जाणाऱ्यांना हौशे-नवशे-गवसे म्हणतात”, रशियातील महिलेचा किस्सा सांगत शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला! "महिन्या-पंधरा दिवसांत सगळे एकत्र बसून चर्चा करून मला येऊन सांगा. बारामतीत सांगा, नाहीतर पुणे-मुंबईत येऊन सांगा की आता आम्ही एक झालो आहोत. आमच्यापैकी कुणालाही तुम्ही संधी द्या, आम्ही त्याच्यासाठी काम करतो एवढं तुम्ही मला सांगा. या तालुक्याचा चेहरा बदलेल याची खात्री मी तुम्हाला देतो", असा निर्धार यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.