नगर : पारनेर नगरपंचायतमधील शहर विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा भालेकर व नगरसेवक भूषण शेलार या दोघांनी आज, गुरुवारी आमदार नीलेश लंके व जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचा पारनेरमधील सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रवेश केलेल्या दोघांसह राष्ट्रवादीच्या एकूण ९ नगरसेवकांची गटनोंदणी करण्यात आली. गटनेता म्हणून श्रीमती भालेकर यांची तर त्यांचे पती अर्जुन भालेकर यांची पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ७, शिवसेना ६, शहर विकास आघाडी २, भाजप व अपक्ष प्रत्येकी १ असे संख्याबळ झाल्याने पारनेर नगर पंचायतीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र निवडणूक निकालानंतर लगेचच आ. नीलेश लंके यांनी सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या. त्यांनी शहर विकास आघाडीचे प्रमुख चंद्रकांत चेडे, उद्योजक अर्जुन भालेकर यांच्यासह अपक्षांनी राष्ट्रवादीला साथ द्यावी असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत चेडे, भालेकर पती-पत्नी, नगरसेवक शेलार यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर आ. लंके व जिल्हाध्यक्ष फाळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांकडे ९ जणांची गटनोंदणी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१७ सदस्यसंख्या असलेल्या नगर पंचायतीत बहुमताचा आकडा गाठण्यात आ. लंके यांना निकालानंतर अवघ्या काही तासात यश मिळाले. त्यामुळे पारनेरमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर सत्ता स्थापन करणार हे निश्चित झाले आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आत्मा समितीचे अध्यक्ष, वकील राहुल झावरे, लंके प्रतिष्ठानचे कारभारी पोटघन, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार नितीन अडसूळ, बाळासाहेब मते, डॉ. बाळासाहेब कावरे, डॉ. सादिक राजे, सतीश भालेकर यांनी प्रयत्न केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp claims power in parner nagar panchayat zws
First published on: 21-01-2022 at 01:01 IST