scorecardresearch

तोटय़ातील दूध संघाच्या निवडणुकीतही चुरस

 एकेकाळी वैभवाच्या शिखरावर राहिलेला जिल्हा दूध संघ सध्या अखेरच्या घटका मोजत आहे.

एजाज हुसेन मुजावर, लोकसत्ता 

सोलापूर : दूध व्यवसायातील स्पर्धा आणि मागील दहा वर्षांत बदलत गेलेली स्थानिक राजकीय समीकरणे यामुळे दयनीय स्थितीत असलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या शनिवारी होत आहे. १७ पैकी एक जागा बिनविरोध झाली असून उर्वरित १६ जागांसाठी ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

 एकेकाळी वैभवाच्या शिखरावर राहिलेला जिल्हा दूध संघ सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. कोटय़वधींचे कर्ज डोक्यावर असलेल्या या दूध संघाची खडतर वाटचाल असतानासुध्दा याच संस्थेवर यापूर्वी अनेक वर्षे कारभार पाहिलेली तालुका पातळीवरील प्रस्थापित नेते मंडळी पुन्हा संस्था काबीज करण्यासाठी एकवटली आहेत. पार रसातळाला गेलेल्या जिल्हा दूध संघात सध्या कारभार करण्यासारखे आहेच काय, अशी प्रश्नार्थक स्थिती असतानाही प्रस्थापित नेत्यांनी त्यासाठी पुन्हा जोर लावला आहे. यात दूध संघाची कोटय़वधी रुपयांची मालमत्ता असल्यामुळे त्यावर डोळा ठेवूनच ही निवडणूक लढविली जात असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदरपासून झालेल्या न्यायालयीन लढाईलादेखील मोठा  अर्थ  प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे.

 माळशिरस तालुक्याचा अपवाद वगळून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा कारभार या अगोदर दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, पंढरपूरचे दिवंगत नेते सुधाकर परिचारक यांच्या देखरेखीखाली चालत असे. त्यावेळी वैभवाच्या शिखरावर असताना दूध संघ दररोज साडेचार ते पाच लाख लिटर दूध संकलित करीत असे. या संस्थेकडे दुभती गाय म्हणूनच पाहिले जात होते. त्यामुळे तालुक्याच्या पातळीवरील नेते मंडळी या दूध संघावर स्वत:ची वर्णी लावून घेण्यासाठी धडपडत असत. ज्यांनी या संस्थेचा प्रत्यक्ष कारभार केला, त्यापैकी बहुतांशी नेते पुढे आमदार, मंत्री होऊन स्वत: गब्बर झाले.  संघ राखणार तो दूध चाखणार  अशीच त्यावेळची परिस्थिती होती. त्या काळी दूध संघाने नव्या मुंबईत वाशीसारख्या ठिकाणी कोटय़वधी रुपये किमतीचा भूखंड खरेदी करून तसेच बँकांमध्ये ठेवी वाढवून स्वत:ची ऊर्जितावस्था भक्कम केली होती. दूध उत्पादक, गोपालक शेतकऱ्यांनाही या दूध संघाने मोठा आधार देत त्यांच्या आयुष्याला स्थैर्य देण्यासाठी भरीव योगदान दिले होते.

नेतृत्वाचा अभाव

पुढे राज्यात दूध व्यवसायच अडचणीत आला आणि त्यात स्पर्धाही वाढत गेली. त्यामुळे जिल्हा दूध संघासमोर आव्हान उभे राहिले. त्यातच अलीकडे सोलापूर जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलली आणि ज्येष्ठ नेते मंडळींचा धाकच उरला नाही. त्यामुळे दूध संघाची वाटचाल अधोगतीकडे होत गेली. दिवसेंदिवस संकटे वाढतच गेल्यानंतर दूध संघ त्यातून बाहेर पडण्याची स्थिती धूसर झाली. परिणामी, दूध संघात मलईच काय, दूधही उरणे दुरापास्त झाल्यानंतर प्रस्थापित नेत्यांनी मग दूध संघाच्या मालमत्तेवर नजर ठेवून ती विकण्याचा घाट घातला. विशेषत: नव्या मुंबईत वाशी येथील कोटय़वधी रुपयांचा दहा गुंठे भूखंडावर सर्वाचा डोळा होता. हा भूखंड विकण्यासाठी शासनाकडून मंजुरीही घेण्याचा प्रयत्न झाला. त्यात यश आले नाही. नंतर संघावर प्रशासकीय मंडळ आल्यानंतर पुन्हा नव्या मुंबईच्या भूखंड विक्रीचा घाट घातला गेला होता. सुरुवातीला मंजुरी आणि नंतर स्थगिती असा  अर्थ पूर्ण खेळही खेळला गेला.  सध्या दूध संघाला इतरांची सुमारे ४० कोटी रुपयांची देणी आहेत. दरमहा २५ लाख रुपये केवळ व्याज द्यावे लागते. हे व्याज भरले तरीही इतरांची देणी देऊन दूध संघाचा गाडा चालविणे कठीण आहे. नव्या मुंबईतील भूखंड विनावापर पडूनच आहे. त्याचा कसलाही उपयोग होत नाही. त्यामुळे आर्थिक संकटातून दूध संघाला बाहेर काढून पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी संघाची एखादी मालमत्तेची विक्री केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे गणित मांडण्यात आले होते. तूर्त तरी हा भूखंड दूध संघाकडे शाबूत आहे. परंतु निवडणुकीनंतर पुन्हा हा भूखंड विक्रीचा विषय समोर येण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. त्यावर डोळा ठेवूनच प्रस्थापित नेते मंडळींनी या निवडणुकीत उतरल्याचा आरोप दस्तूरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनीच केला आहे.

 साठे हे दूध संघात जाण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी स्वत:चा आणि आपल्या सुनेचा उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु प्रस्थापित मंडळींच्या पॅनेलने नाकारल्यामुळे साठे हे दूध संघ बचाव पॅनेलच्या तंबूत गेले आहेत. अनिल आवताडे हे दूध बचाव पॅनेलचे अधिपत्य करीत प्रस्थापितांसमोर आव्हान उभे केले आहे.

प्रस्थापित मंडळींच्या पॅनेलची धुरा माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-आनगरकर आणि बार्शीचे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आणि सध्या शिवसेनेचे नेते दिलीप सोपल हे वाहात आहेत. या पॅनेलमधून आमदार बबनराव शिंदे यांनी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे आणि दिलीप सोपल यांनी त्यांचे पुतणे योगेश सोपल यांची वर्णी लावली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp congress even in the election of loss making milk team akp

ताज्या बातम्या