शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान आणि विषारी कीटकनाशकांमुळे यवतमाळ जिल्ह्यात गेलेल्या बळींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी नागपूरमध्ये जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले. नागपूरमधील धनवटे कॉलेज येथून राष्ट्रवादीच्या मोर्चाला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला असून वाढदिवस असतानाही शरद पवार या मोर्चात सहभागी झाले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने नागपूरमध्ये हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १९८५ नंतर होणारा हा मोर्चा विक्रमी ठरावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेसनेही या मोर्चासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. या मोर्चाला आरपीआयने (गवई गट) पाठिंबा दिला आहे. याशिवाय शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय (कवाडे गट), समाजवादी पक्ष आणि माकपनेही या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला. विरोधकांची एकजूट झाल्याने राज्य सरकारचेही या मोर्चाकडे लक्ष लागले होते.

राज्यभरात निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाशी या मोर्चाची तुलना होणार असल्याने विरोधकांनीही जोरदार शक्तीप्रदर्शनासाठी आपली ताकद पणाला लावल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे नेते गुलामनवी आझाद हे देखीलया मोर्चात सहभागी झाले होते.

LIVE UPDATES:

* विरोधकांना पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारची झोप उडाली असणार: प्रफुल पटेल

* आम्हाला सत्तेत येण्याची घाई नाही : गुलाम नवी आझाद

* सत्ताधारी नेते सभागृहात म्हणतात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला हे स्टँप पेपरवर लिहून देतो. मग इथे एवढे शेतकरी उपस्थित कसे? : सुनील तटकरे

* शेतकरी आणि जनहिताचे निर्णय घ्या नाहीतर ज्या जनतेने डोक्यावर घेतले तीच जनता पायाखाली घेतल्या शिवाय राहणार नाही: धनंजय मुंडेंचा सरकारला इशारा

*  फडणवीस सरकारच्या काळात तीन वर्षात १५ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या, या शेतक-यांच्या आत्महत्येचे पाप कोणाचे ? : धनंजय मुंडे</p>

* झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी राष्ट्रवादीने हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले: माजी मंत्री अमित देशमुख

* हल्लाबोल मोर्चात हजारोंची गर्दी

* काँग्रेसच्या मोर्चालाही सुरुवात, थोड्याच वेळात दोन्ही पक्षांचे मोर्चे लोकमत चौक येथे एकत्र येणार, तिथून हा संयुक्त मोर्चा विधानभवनावर धडकणार

* मोर्चासाठी काटोल नरखेड, परिडसिंगी येथून ५०० गाड्या नागपूरच्या दिशेने रवाना, मात्र वाहतूक कोंडीमुळे गाड्या खोळंबल्या

* धनवटे कॉलेज मैदानात १४ हजारहून अधिक जनता मोर्चात सहभागी, तर दीक्षाभूमी परिसरातून १० हजारहून अधिक लोकं मोर्चात सहभागी

* हल्लाबोल मोर्चामुळे नागपूर शहरात वाहतूक कोंडी

* राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चास धनवटे कॉलेज येथून सुरुवात