scorecardresearch

“हिंदुत्ववादी सरकार म्हणायचं आणि मंदिराची जागा लाटायची”, राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपाच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे. भाजपा हिंदू समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार करत आहे, असा आरोप महेश तपासे यांनी केला.

“हिंदुत्ववादी सरकार म्हणायचं आणि मंदिराची जागा लाटायची”, राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपाच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे. भाजपा हिंदू समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार करत आहे, असा आरोप महेश तपासे यांनी केला. तसेच स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणायचं आणि मंदिराची जागा लाटायची, असे प्रकार सुरू असल्याची बोचरी टीका तपासे यांनी केली. ते शनिवारी (३ डिसेंबर) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

महेश तपासे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर मंदिराची जमीन लाटण्याचा गुन्हा दाखल झाला. स्वत:ला हिंदुत्ववादी सरकार म्हणायचं आणि मंदिराची जागा लाटायची असा हा फार मोठा गंभीर प्रकार आहे. भाजपाच्या नेत्यांकडून हा हिंदू समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.”

“भावनिक गोष्टींवर राजकारण करण्यामध्ये सरकार व्यग्र”

शिंदे-फडणवीस सरकारवर बोलताना महेश तपासे म्हणाले, “या सरकारचा कारभार नियोजनशुन्य आहे. हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो. शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीचे निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला होता. या गोष्टीला एक अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायलयाने दिली आहे. महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय योग्य होते, हे एक प्रकारे सिद्ध झालं आहे.”

हेही वाचा : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तुला माहीत आहे ना मी हे करू शकत नाही”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत

“जनतेच्या पैशांचा चुराडा या सरकारच्या माध्यमातून केला जात आहे. या अधिकाऱ्यांना तातडीने प्रतिनियुक्ती दिली, तर जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्यरत ठेवता येईल, अशा पद्धतीचे निर्णय शिंदे सरकार घेत नाही. फक्त भावनिक निर्णय आणि भावनिक गोष्टींवर राजकारण करण्यात हे सरकार व्यस्त आहे,” असा आरोप तपासे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 18:39 IST

संबंधित बातम्या