“देश २०२२मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. तोपर्यंत आमचे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार”, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत या आश्वासनाचं काय झालं? असा प्रश्न विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून पंतप्रधान मोदी यांचा एक जुना व्हिडीओ शेयर करत त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला केवळ आठ दिवस बाकी आहे, याची आठवणही या व्हिडीओतून करून देण्यात आली आहे. “देशातल्या शेतकऱ्यांचे २०२२मध्ये उत्पन्न दुप्पट होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. उत्पन्न दुप्पट व्हायचे सोडाच. पण जे उत्पन्न आधी मिळत होते, ते देखील खत, बियाणे, अवजारे यांच्या महागाईमुळे मिळेनासे झाले.”, असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींनी दिले होते आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, अशी घोषणा केली होती. यासाठी २०१९मध्ये एक समितीही स्थापन करण्यात आली होती. तसेच या समितीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सात स्त्रोत सुचविले होते. त्यात पिकांची उत्पादकता वाढविणे, उत्पादन खर्चात कपात करणे, पशुधनाची उत्पादकता वाढविणे, अधिक मूल्य असलेल्या पिकांची लागवड, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरात वाढ करणे, पीक घनता वाढविणे आणि शेती व्यवसायातून इतर व्यवसायात स्थलांतर करणे, यांचा समावेश होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp criticized pm narendra modi on farmers double income spb
First published on: 07-08-2022 at 21:06 IST