बीड येथील शासकीय बैठका आटोपून परत परळीला निघालेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणाचे प्राण वाचवले आहेत. बीडवरून परळीकडे जात असताना सिरसाळा ते पांगरी दरम्यान एक तरुण दुचाकीस्वार अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हे दृश्य पाहताच धनंजय मुंडे यांनी आपला ताफा तात्काळ थांबवून अपघातग्रस्त तरुणाच्या दिशेने धाव घेतली.

धनंजय मुंडे यांनी सर्वात प्रथम हा अपघातग्रस्त तरुण शुद्धीत असल्याची खात्री केली. यावेळी त्याने आपलं नाव महेश असल्याचं सांगत पांगरी (ता. परळी) येथील असल्याचं सांगितले.

तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपल्या स्वीय सहाय्यकांना पोलीस व रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन लावायला लावला. धनंजय मुंडे यांनी स्वतः संवाद साधल्यानंतर अगदी दोनच मिनिटात रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाली. धनंजय मुंडे यांनी सदर तरुणाला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा सूचना दिल्या. तसंच रुग्णालय प्रशासनाला देखील याबाबत दक्षता घेण्याबाबत धनंजय मुंडे यांनी सूचना दिल्या.

सदर तरुणास अंबाजोगाईकडे रवाना केल्यानंतर घटनेची माहिती अपघातग्रस्त तरुणाच्या कुटुंबास मिळाली. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता धनंजय मुंडे यांची रस्त्यात भेट झाली. तेव्हा ताई तुम्ही काळजी करू नका, सावकाश अंबाजोगाईला जा, तो बरा आहे, शुद्धीवर आहे, बोलतोय, रुग्णालयात देखील मी बोललो आहे अशी सांगत त्यांना धीर दिला. तसेच त्यांनाही अंबाजोगाईला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून दिली.