राज्याच्या ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर पीछेहाट झाली, तर सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक पटकावून राज्यात पक्षाची ताकद वाढवली. काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर असला तरी विदर्भाने नेहमीप्रमाणे काँग्रेसला साथ दिली. अनेक दिग्गज नेत्यांनाही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगरपंचायतींमध्ये भाजपला सर्वाधिक जागा; राष्ट्रवादीला बळ, शिवसेना चौथ्या क्रमांकावर

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (भाजप), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, भाजपचे माजी मंत्री राम शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्यासह भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनाही पराभवाचा धक्का बसला.

शिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी

अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली. नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली. राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांना हा आपल्याच होमपीचवर जबर धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला ७ जागा आल्या, तर भाजपाला अवघी एक जागा मिळवता आली. ईश्वरचिठ्ठीने ही जागा भाजपाकडे आली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.

दरम्यान एकनाथ खडसे यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली असून शिवसेना आणि भाजपाची छुपी युती असल्याचा आरोप केला आहे. “एक जागा ईश्वरचिठ्ठीने आणि एक जागा सहा मतांनी गमावली आहे. पण शेवटी पराभव तर पराभवच आहे. भाजपा आणि शिवसेनेची छुपी युती होती. गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदारांमध्ये तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली. पेपरमध्ये फोटोही आले आहेत. त्यामुळे फक्त राष्ट्रवादीचा पराभव करा या हेतूने सर्व पक्ष एकत्र आले होते. तरीही आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. ईश्वचिठ्ठीमुळे दुर्दैवाने गेलो नाहीतर बहुमतापर्यंत आलो असतो. पण हा पराभव का झाला याचं चिंतन करण्याची गरज असून आम्ही ते करु,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी ठरला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष

भाजपाला राष्ट्रीय पातळीवर आव्हान देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असला तरी राष्ट्रवादीने ३४४ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचे यश संपादन केले. विधानसभेपाठोपाठ नगरपंचायतींमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला मागे टाकले आहे. राष्ट्रवादीला आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात चांगले यश मिळायचे. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, कोकणात यश मिळाले आहे. प्रचाराच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आजच्या निकालावरून राष्ट्रवादी हा राज्यातील मोठा पक्ष असल्याचे सिद्ध झाले, असा चिमटा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस यांनी उद्देशून काढला. सत्तेचा वापर करीत राष्ट्रवादीने पक्षाचा पाया विस्तारला. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. विदर्भातही राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढले आहे. आर. आर. पाटील यांचे पूत्र रोहित यांच्या नेतृत्वाखाली कवठे-महाकांळमध्ये राष्ट्रवादीला सत्ता मिळाली. २३ वर्षीय रोहित पाटील यांना पहिल्याच प्रयत्नात चांगले यश मिळाले. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड या आपल्या मतदारसंघात वर्चस्व कायम राखले.

नगरपंचायतीतील एकूण जागा १६४९

भाजप – ३८४

राष्ट्रवादी – ३४४

काँग्रेस – ३१६

शिवसेना – २८४

मनसे – ४

अपक्ष – २०६

स्थानिक आघाड्या – ८२

बसपा – ४

माकप – ११

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp eknath khadse on bjp shivsena jalgaon bodvan nagar panchayat election sgy
First published on: 20-01-2022 at 10:45 IST