गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हनुमान चालीसा, मशिदींवरील भोंगे, मनसे-शिवसेनेच्या सभा यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यामुळे धर्मा-धर्मात तेढ निर्माण होत असल्याची देखील भूमिका मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मतप्रवाह दिसून येत आहे. यासंदर्भात भुसावळमध्ये माध्यमांशी बोलताना राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी खोचक शब्दांत टिप्पणी केली आहे. तसेच, त्यांनी नागरिकांना आवाहन देखील केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“गेल्या ४० वर्षांत असं काही अनुभवलं नाही”

भुसावळमध्ये एका कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात व्यासपीठावरून देखील यासंदर्भात टीका केल्यानंतर माध्यमांशी बोलताना खडसेंनी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर तीव्र शब्दांत नापअसंती व्यक्त केली. “सध्या राज्याच्या राजकारणात गढूळ वातावरण निर्माण झालं आहे. एकमेकांवर टिका-टिप्पणी करत हा बोलला की त्याला उत्तर दे, तो बोलला की त्याला उत्तर दे असं सुरू आहे. अगदी खालच्या स्तरावर टीका-टिप्पणी सुरू आहे. गेल्या ४० वर्षांत मी अस काही अनुभवलं नव्हतं”, असं खडसे यावेळी म्हणाले.

“हे जे काही चाललं आहे, ते मनोरंजन म्हणून पाहा. ते फार गांभीर्याने घेऊ नका. भोंगा काढला काय, राहिला काय, तुमचं पोट भरणार नाहीये”, असं आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केलं.

“हा सगळा माथी भडकवण्याचा प्रकार”

दरम्यान, याआधी व्यासपीठावरून बोलताना देखील खडसेंनी यावरून निशाणा साधला. “महाराष्ट्रात सध्या वातावरण वेगळं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात असं राजकारण सुरू आहे की ज्यामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होतो. सदावर्ते आले की त्यांचीच १५-२० दिवस चर्चा असते, हनुमान चालीसेचा मुद्दा काही दिवस चालतो. नंतर भोंग्याचा मुद्दा काही दिवस चालतो. आता कधी उद्धव ठाकरेंचं भाषण होतं, मग राज ठाकरेंचं भाषण होतं. कधी नारायण राणेंचं भाषण होतं, कधी देवेंद्र फडणवीसांचं भाषण होतं. मी कुणाच्या भाषणावर टीका-टिप्पणी करणार नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी घडलं नाही. गेल्या ४० वर्षांपासून मी राजकारणात आहे. मी असं वातावरण पाहिलं नाही. हा माथी भडकवण्याचा प्रयत्न आहे. एवढ्या खालच्या स्तरावरचं राजकारण मी आजपर्यंत नाही पाहिलं”, असं खडसे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp eknath khadse targets hanuman chalisa issue raj thackeray devendra fadnavis pmw
First published on: 17-05-2022 at 10:46 IST