सांगलीत काँग्रेस फोडण्यावर राष्ट्रवादीचा भर

मिरज हा तसा काँग्रेसचा गड, सामान्य कुटुंबातील हाफिज धत्तुरे यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.

दिगंबर शिंदे, लोकसत्ता 

सांगली : जिल्ह्य़ात मिरज तालुका राजकीयदृष्टय़ा  जागृत म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यावर पकड मिळविण्याचे प्रयत्न सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केले असून याला किनार आहे ती तीन महिन्यांवर येउन ठेपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची. आगामी काळात मिरज विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचाच प्रतिनिधी निवडून जाईल असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी केला. पक्ष विस्तार करीत असताना भाजपची कुमक मिळविण्यापेक्षा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसच्या तटबंदीला खिंडार पाडण्याचाच डाव राष्ट्रवादीचा आहे.

जिल्हयाचे मुख्यालय सांगली मिरज तालुक्यात असल्याने या तालुक्यातील राजकीय घडामोडींचा परिणाम जिल्हयाच्या राजकारणावर सातत्याने घडत आला आहे. सांगलीची जी भूमिका असेल बरोबर त्याच्या उलटी भूमिका मिरजकरांची  बऱ्याचवेळा दिसून आली आहे. मतदार संघ आरक्षित झाल्यानंतर तासगाव तालुक्यातील पेडच्या सुरेश खाडे यांनी जतमार्गे मिरजेत येउन बस्तान बसविले. या मतदार संघामध्ये एकेकाळी शिवसेनेची ताकद होती.

खाडे यांना मिरजेत बस्तान बसवू देण्यात भाजपच्या मर्यादित ताकदीपेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादीमधील कुमकच महत्वाची ठरत आली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये विरोधक म्हणजे पालापाचोळा अशी भाषा वापरणाऱ्या खाडे यांना विजयासाठी अखेरच्या टप्प्यात झुंजावे लागू शकते हे मतदारांनी दाखवून दिले आहे. खाडे यांचा सध्याचा कारभार हा केवळ आयात नेतृत्वावरच सुरू आहे. मिरज पंचायत समिती ताब्यात असली तरी काठावरचे बहुमत आहे. पदाधिकारी बदलासाठी खा. संजय पाटील यांनी पुढाकार घेतला तरच व्यवस्थित बदल होउ शकतो, अन्यथा खाडे यांच्या स्वबळापेक्षा अन्य पक्षाकडून येणाऱ्या कुमकीवर भिस्त ठेवावी लागते.

मिरज हा तसा काँग्रेसचा गड, सामान्य कुटुंबातील हाफिज धत्तुरे यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीने हा मतदार संघ ताब्यात घेतला. बाळासाहेब व्हनमोरे यांच्या रूपाने या पक्षाने ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नाला स्वपक्षियांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. हाच धागा पकडून पालकमंत्री पाटील यांनी तळागाळात वलय असलेल्या मनोज शिंदे यांना ताकद देण्याचा प्रयत्न मेळाव्याच्या निमित्ताने केला. नुकतीच त्यांची जिल्हा नियोजन मंडळाचे निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.  सांगली बाजार समितीच्या माध्यमातून त्यांना पुढे आणण्याची खेळी खेळली जाउ शकते.

आर्थिक ताकद

सांगली बाजार समिती ही जिल्हयातील आर्थिक ताकद असलेली समिती आहे. मिरज, जत आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यांचे कार्यक्षत्र  या समितीचे आहे. या समितीचा वार्षिक उलाढाल दीड हजार कोटींची असल्याने अनेक राजकीय कार्यकर्त्यांंची या समितीचे संचालक होण्याची  इच्छा होते.

 गेल्या वेळी बाजार समितीवर काँग्रेसचे पॅनेल निवडून आले होते. या पॅनेलमधील संचालकांनी कधी भाजपची सत्ता होती, तोपर्यंत भाजपशी जवळीक साधली. राज्यात सत्ता बदल होताच, बहुसंख्य संचालक राष्ट्रवादीत सहभागी झाले. दोन दशकापूर्वी बाजार समितीच्या त्रिभाजनाचा मुद्दा गाजला होता. अगदी सर्वोच्च न्यायालयापय्रंत प्रकरण गेले होते. मात्र  सांगलीच्या बाजार समितीवर असलेला कब्जा सोडण्यास जत व कवठेमहांकाळ तालुके राजी होत नाहीत. अन्य ठिकाणी तालुका कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समित्या कार्यरत असताना सांगलीमध्ये मात्र तीन तालुक्यांची एकत्रित बाजार समिती असावी हे राजकीय इच्छाशक्तीमुळेच शक्य झाले आहे.

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास कामामुळे सामान्य माणसामध्ये विश्वास निर्माण करण्यात राष्ट्रवादी यशस्वी होत आहे. भाजपने मिरज दंगलीचा राजकीय लाभ उठवित मिरजेवर कब्जा मिळवला असला तरी आता सामान्य माणूस भावनिकेतपेक्षा वैचारिक भूमिकेला पाठबळ देत आहे. यामुळे मिरज तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देणे राष्ट्रवादीचे ध्येय आहे

मनोज शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

राष्ट्रवादीने स्वबळाबरोबरच जिल्हयातील सत्ता केंद्रे ताब्यात घेण्याची केवळ दिवास्वप्ने पाहावीत. कारण भाजपला मिळालेले यश हे प्रस्थापितांच्या नाकर्तेपणातूनच मिळालेले असून आमच्या पक्षातून एकही कार्यकर्ता बाहेर पडलेला नाही. जिल्हा परिषदेत यावेळी भाजप स्वबळावर सत्ता स्थापन तर करेलच पण जिल्हृयातील खासदारकीसह आठही मतदार संघावर कब्जा करण्याचे आमचे ध्येय आहे.

दीपक शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp emphasis on breaking congress in sangli zws

ताज्या बातम्या