|| हर्षद कशाळकर
अलिबाग : जिल्ह्यातील सहापैकी चार नगरपंचायतींमध्ये राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष ठरला. जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असलेल्या शेकापला वर्चस्व कायम राखता आलेले नाही.
तळा आणि म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले, तर पालीमध्ये शेकापच्या मदतीने राष्ट्रवादी सत्ता मिळू शकतो. राष्ट्रवादीचे सर्वाधिक ३९ तर शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले. तळा नगरपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व होते, मात्र त्याने सत्ता गमावली. राष्ट्रवादीचे सर्वाधिक १०, भाजपचे तीन, तर शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आले. शिवसेना व भाजपमधील मतविभाजनाचा फायदा राष्ट्रावादीला झाला. पाली या नव्या नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे सहा, तर शेकापचे चार निवडून आले. माणगावमध्ये शिवसेना व भाजप एकत्र आल्याने राष्ट्रवादीला सत्ता मिळू शकली नाही. शिवसेनाप्रणीत युतीला नऊ तर राष्ट्रवादी, शेकाप युतीला ८ जागा मिळाल्या. खालापूरमध्ये शिवसेना व शेकापला प्रत्येकी सात तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या.