NCP Foundation Day: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २७ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे. सुळेंनी केलेल्या पोस्टमध्ये शरद पवारांनी आजच्याच दिवशी पक्षाची स्थापन केल्याचा उल्लेख केला आहे तर, सुनेत्रा पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये शरद पवारांचा उल्लेख देखील केलेला नाही. सुनेत्रा पवारांनी पोस्टमध्ये अजित पवार हयात नसल्याची खंत व्यक्त करत त्यांचा विचार आणि कार्यासा वारसा पुढे घेऊन जाण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.

सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांची पोस्ट

सुप्रिया सुळेंनी एक्स सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये, “आजच्याच दिवशी आदरणीय पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली होती. गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ आपण देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत सक्रिय योगदान देत आलो आहोत,” असे म्हटले आहे. तर, “यंदाचा वर्धापन दिन साजरा करताना मनात एक वेगळीच भावना दाटून येते. कारण आज आदरणीय अजित दादा आपल्यात नाहीत. दादा हे फक्त पक्षाचे नेते नव्हते, तर ते आधारवड होते”, अशा शब्दात सुनेत्रा पवारांनी भावाना व्यक्त केल्या आहेत.

सुप्रिया सुळेंनी पोस्ट काय?

“आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा २७ वा वर्धापन दिन…! आजच्याच दिवशी आदरणीय पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली होती. गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ आपण देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत सक्रिय योगदान देत आलो आहोत. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेला ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा विचार आपल्या कामाचे सूत्र आहे. आपली निष्ठा महाराष्ट्राच्या प्रागतिक विचारधारेशी तर बांधिलकी येथील जनतेशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा वैचारिक वारसा कायम ठेवण्याचा आपण कसोशीने प्रयत्न केला आणि यापुढेही करु”, असे म्हणत त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि शुभचिंतकांचे आभार मानले आहेत.

सुनेत्रा पवारांची पोस्ट काय?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी देखील पक्षाच्या वर्धापन दिनाच्यानिमित्ताने शुभेच्छा देत अजित पवार हयात नसल्याची खंत बोलून दाखवली. “दादा आज आपल्यात नाहीत. सभागृहात भाषणं होतील, कार्यकर्त्यांचे मेळावे होतील, पक्षाचा झेंडा तितक्याच अभिमानानं फडकेल, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील. दादा हे फक्त पक्षाचे नेते नव्हते, तर ते आधारवड होते. कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे, चूक झाली तर कान धरून समजावणारे आणि चांगलं काम केलं तर पाठीवर कौतुकाची थाप देणारे दादा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले होते. त्यांनी जपलेला माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता”, असे सुनेत्रा पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, सुनेत्रा पवारांनी पोस्टमध्ये शरद पवारांचा उल्लेख करणे टाळले आहे.

विलिनीकरणाच्या चर्चेला फुलस्टॉप

अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले होते. दोन ते तीन महिने झालेल्या दाव्या-प्रतिदाव्यांनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विलिनीकरणाची चर्चा थांबवल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली होती. दरम्यान, आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्यानिमित्ताने सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची पोस्ट चर्चेच्या विषय ठरल्या आहेत.