दोन शिवसैनिकांच्या खून प्रकरणी राष्ट्रवादीच्या फरारी कार्यकर्त्यांना अटक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यात एका मंदिरामध्ये या सर्व आरोपींनी आसरा घेतला होता.

सोलापूर : मोहोळ येथे राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमधील वैयक्तिक आणि राजकीय वादातून दोन शिवसैनिकांच्या अंगावर टेम्पो घालून त्यांचा निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी गेले तीन आठवडे फरारी असलेल्या राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी अखेर अटक केली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यात एका मंदिरामध्ये या सर्व आरोपींनी आसरा घेतला होता.

संतोष जनार्दन सुरवसे, त्याचा भाऊ  पिंटू जनार्दन सुरवसे, रोहित ऊ र्फ अण्णा अनिल फडतरे, रमेश ऊ र्फ गोटू सुरवसे आणि आकाश बरकडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. टेम्पोचालक भय्या अस्वले यास यापूर्वीच अटक झाली आहे.

गेल्या १५ जुलै रोजी सतीश नारायण क्षीरसागर (वय ३०) व त्यांचे सहकारी विजय नागनाथ सरवदे (वय २४, दोघे रा. सिद्धार्थनगर, मोहोळ) या दोघा शिवसैनिकांच्या अंगावर टेम्पो घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नावे संशयित म्हणून समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार महिन्यांपूर्वी मोहोळ शहरातील प्रभाग क्र . ८ व ९ मधील मतदार नोंदणी खोटी आणि बनावट असल्याचा आक्षेप शिवसैनिक सतीश क्षीरसागर व विजय सरवदे यांनी घेतला होता.

त्यावर चौकशी होऊ न बनावट मतदार नोंदणी रद्द झाली होती. तसेच रमाई घरकुल योजनेत मंजूर झालेली १८ प्रकरणे गायब झाल्याने त्यास वाचा फोडण्यासाठी क्षीरसागर व सरवदे यांनी आंदोलन केले होते. यात हितसंबंध आडवे आल्यामुळे राष्ट्रवादीचे संतोष सुरवसे आदी त्यांच्यावर चिडून होते. त्यातूनच कट रचून क्षीरसागर व सरवदे या दोघांना जेवायला म्हणून बोलावले आणि त्या दोघांचा खून केल्याचा आरोप आहे. पोलीस निरीक्षक अशोक सायकर हे पुढील तपास करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp fugitives arrested in murder of two shiv sainiks akp

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या